शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (15:30 IST)

एक असा शोध, ज्यामुळे समुद्रातील लाखो जहाजं बचावली

एड्रियन बर्नहार्ड
 
"जर मी रोमन कॅथलिक असतो तर एखाद्या संताचं चॅपल उभारण्याचा संकल्प मी केला असता. पण मी रोमन नाही. म्हणूनच जर मला काही संकल्प करावाच लागला तर तो लाईटहाऊस बनवण्याचा असेल." - बेंजामिन फ्रँकलिन, जुलै 1757
 
अमेरिकेच्या इतिहासावर ज्या लोकांची अभूतपूर्व छाप आहे त्यापैकी एक आहेत बेंजामिन फ्रॅंकलिन. अशा व्यक्तीला लाईटहाऊस किंवा दीपस्तंभाचं इतकं आकर्षण का असावं असा प्रश्न सहजच मनात येतो ना.
 
दीपस्तंभ म्हणजे काय? तर, समुद्रातल्या जहाजांना बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता दाखवण्याचं काम दीपस्तंभ म्हणजेच लाईटहाऊस शतकानुशतकं करत आहेत.
 
तुम्ही म्हणाल मग हा शोध इतका महत्त्वाचा कशासाठी. कल्पना करा, की हा शोध लागण्यापूर्वी रात्रीच्या वेळी जहाजं किनाऱ्यावर कशी येत असावीत. किनारा कुठे आहे हे समजण्यासाठी डोंगरांवर आग निर्माण केली जात असे. त्यामुळे जहाजाच्या कप्तानाला कल्पना येत असे की या दिशेला किनारा आहे.
 
पुढे त्याची जागा कोळसा आणि तेलाच्या दिव्यांनी घेतली. दिव्याचा प्रकाश वाढवण्यासाठी आरसे लावण्यात येत म्हणजे ते दूरवर समुद्रातूनही दिसून येत.
 
पण अंधारात आणि वादळी रात्रींमध्ये दिव्यांचा उजेड पुरेसा नव्हता. म्हणूनच नाविकांना किनारा आल्याचं वेळेत लक्षात येत नसे. मग ही जहाजं किनाऱ्यावर असलेल्या खडकांवर आदळत असत आणि नंतर त्या जहाजांच्या अवशेषच सापडत असत.
 
नवा शोध
1820च्या दशकात ऑगस्टिन फ्रेस्नेल नावाच्या एका फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञाने शोधलेल्या नवीन प्रकारच्या भिंगामुळे (लेन्स) परिस्थिती बदलली.
 
त्यांनी क्रिस्टलचा लोलक असणारी रिंग घुमटाच्या आकारात बसवली. ज्याने अपरावर्तित प्रकाशही परावर्तित करता येत होता.
 
फ्रेस्नेलने ही लेन्स फ्रान्सच्या कॉर्डोन लाईटहाऊसवर बसवली. हे दीपस्तंभ बॉर्डेक्सपासून 100 किलोमीटरवरच्या उत्तरेकडील टोकावर होतं.
 
फ्रेस्नेलने लेन्स लावल्यानंतर लाईटहाऊसमधील दिवा समुद्रामध्ये अनेक मैल दूर असणाऱ्या नाविकांनाही रस्ता दाखवू लागला.
 
फ्रान्समधलं सगळ्यात जुनं आणि अजूनही कार्यरत असणारं लाईटहाऊस हे खुल्या समुद्रात बनवण्यात आलेलं जगातलं पहिलं लाईटहाऊस आहे.
 
पांढऱ्या दगडांपासून उभारण्यात आलेली ही इमारत म्हणजे रेनेसाँ (Renaissance ) काळातल्या कलाकृतीचा विलक्षण नमुना आहे. यामध्ये कॅथिड्रल, किल्ला आणि शाही निवासस्थानही आहे.
 
याला 'समुद्रातलं व्हर्साय'ही म्हटलं जातं आणि हे इतिहासाचं आणि सागरी इंजिनियरिंगचं द्योतक आहे.
 
समुद्रातलं व्हर्साय
या दीपस्तंभाला 1862मध्ये फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा दिला. त्याच वर्षी पॅरिसमधलं नोत्र दामही स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं.
 
कॉर्डोन लाईटहाऊस पर्यंत फक्त होडीतूनच जाता येतं आणि त्यानंतर वर पायऱ्या चढून जावं लागतं. इथे पर्यटकांना फ्रान्सच्या वारशाविषयीची माहिती मिळते.
 
मेडॉक हा फ्रान्सच्या नैऋत्येकडील समृद्ध भाग द्राक्षांच्या बागा, वाईन आणि महालांसाठी प्रसिद्ध आहे.
 
बॉर्डेक्सच्या उत्तरेकडे असणाऱ्या सेंट पॅलेस-सुर-मेर शहरामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. अगदी टोकाला असणाऱ्या या शहरातल्या कॉर्डोन लाईटहाऊसचं आकर्षण फार कमी लोकांना आहे.
 
इथल्या समुद्रकिनाऱ्यांवरच्या कॅफेमध्ये ताजे मासे आणि नटेला क्रेप्स बनवतात. अनेक लोक होडीतून सेंट जॅक्सला फेरी मारतात आणि देवदार वृक्षांच्या जंगलात फिरून येतात.
 
दिवसातून एकदाच एक कॅटमरान (मोठी बोट) पोर्ट रॉयनमधून प्रवाशांना लाईटहाऊसकडे घेऊन जाते.
 
शहर हळुहळू धूसर झालं की लाईटहाऊस दिसू लागतं. समुद्राच्या मधोमध इतकी देखणी वास्तू कशी उभारली असेल याचा विचार करून अजूनही लोकं अचंबित होतात.
 
अतुलनीय स्थापत्यशास्त्र
खरंतर कॉर्डोनच्या दीपस्तंभाचं अतुलनीय स्थापत्यशास्त्र हा दीर्घ आणि उलथापालथीच्या इतिहासाचा परिणाम आहे.
 
असं म्हटलं जातं की इथल्या एका लहानशा बेटावर 9व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच एक लहानशी प्रकाश व्यवस्था अस्तित्वात होती. शार्लेमन (चार्ल्स द गॉल) (Charles de Gaulle) ने इथे प्रकाश व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले होते.
 
ब्लॅक प्रिन्स (एडवर्ड ऑफ वेल्स)ने 1360मध्ये इथे टॉवर बनवला. दोनशे वर्षांनंतर 1584मध्ये तिसऱ्या किंग हेन्रीने या बेटावर लाईटहाऊस उभारलं.
 
एडवर्डने उभारलेल्या स्तंभाच्या अवशेषांच्या जागी आपला शाही दिमाख दाखवणारा टॉवर तिसऱ्या हेन्रीला हवा होता.
 
या लाईटहाऊससोबतच शाही निवास, राखणदारांसाठी खोल्या, एक मोठा दिवा आणि चॅपल उभारण्याचे आदेश त्याने पॅरिसचा प्रसिद्ध वास्तुरचनाकार लुई डी फ्वां याला दिले.
 
पण याच्या निर्मितीचं कार्य धर्मावरून झालेली युद्ध आणि आर्थिक-तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळलं. पण लुई डी फ्वां काम करतच राहिला. तिसऱ्या हेन्रीचं निधन झाल्यानंतरही हे काम सुरूच राहिलं.
 
1611मध्ये अटलांटिक समूह आणि या बेटाच्या संगमाच्या दिशेने जाणाऱ्या नाविकांनी पहिल्यांदाच असं 67.5 मीटर उंचीचं देखणं लाईटहाऊस पाहिलं.
 
हवेशीर झरोखे पार करत 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढून जात या दीपस्तंभाच्या वर जाता येत होतं.
 
या दीपस्तंभाच्या सगळ्यांत वरच्या गॅलरीमध्ये जाण्याआधी कदाचित जहाजांचे कॅप्टन्स नॉत्र दाम द कॉर्डोनमध्ये जाऊन आपल्या जहाज्याच्या सुरक्षित सफरीसाठी प्रार्थना करत असावेत.
दीपस्तंभाचं इंधन
पहिल्यांदा 1611मध्ये हा दीपस्तंभ प्रज्ज्वलित करण्यात आला. तेव्हा जळण म्हणून डांबर, पिच (एक प्रकारचा पेट्रोलियम पदार्थ) आणि लाकडाचा वापर करण्यात आला.
 
1640च्या दशकाच्या मध्यात एका वादळामध्ये कॉर्डोनची प्रकाश व्यवस्था उद्ध्वस्त झाली. तेव्हा इथे व्हेलच्या चरबीवर जळणारा कंदील लावून तो धातूच्या बेसिनवर ठेवण्यात आला होता.
 
यामुळे कंदिलाची वात चांगली नियंत्रणात आली पण यामधून बाहेर पडणारा प्रकाश कमी होता.
 
18व्या शतकामध्ये व्हेलच्या चरबीच्या जागी कोळसा वापरला जाऊ लागला पण अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेला उजेड कायम ठेवणं कठीण झालं.
 
राखणदारांना अनेकदा वर कोळसा वाहून नेऊन तो भट्टीत टाकावा लागत असे.
 
1782मध्ये तेलाचा कंदील आणि त्यावर तांब्याचा रिफ्लेक्टर लावण्यात आला. यामुळे राखणदारांना सारखं वर जावं लागत नसे.
 
18व्या शतकाच्या अखेरीस घड्याळं बनवणाऱ्या कारागीरांनी घड्याळांचीच प्रणाली वापरत फिरणारा दिवा बनवला.
 
अशा प्रकारे दिवा फिरणारं जगातलं पहिलं लाईटहाऊस अस्तित्वात आलं.
 
तेलाचा दिवा शांत वातावरणामध्ये खलाशांना आवश्यक ती मदत करू शकत असे. पण त्याचा प्रकाश अंधुक होता. वादळी रात्री त्या दिव्याचा खलाशांना फायदा होत नसे.
 
राजवटीचं प्रतीक
 
1789मध्ये फ्रेंच क्रांतीनंतर फ्रान्समधल्या जुन्या राजवटीच्या सगळ्या खुणा मिटवण्याचे प्रयत्न झाले.
 
कॉर्डोनच्या आतमध्ये असणारे शाही पुतळे आणि राजघराण्याला समर्पित शिलालेखही उद्ध्वस्त करण्यात आले.
 
पण शिल्पकार लुई डी फ्वांचा पुतळा मात्र तसाच ठेवण्यात आला. आजही हा भव्य पुतळा प्रवेशद्वाराजवळ पहाता येतो.
 
जुन्या खुणा मिटवण्यासोबतच या लाईटहाऊसची उपयुक्तता वाढवण्याचे आणि याचा उजेड दूरवर पोहोचण्याचे मोठे प्रयत्न सुरू झाले.
 
विलक्षण शोध
19व्या शतकामध्ये ऑप्टिक्स (प्रकाश शास्त्र) हे क्षेत्र नव्याने उदयाला येत होतं. डच भौतिक शास्त्रज्ञ क्रिश्चियन हिगीन्सने प्रकाशाचा सिद्धांत मांडला ज्यानुसार प्रकाश विविध तरंगांमध्ये प्रवास करत असल्याचं म्हटलं होतं.
 
वैज्ञानिकांना हा सिद्धांत माहिती होता. पण अनेक लोकांना याविषयी शंकादेखील होती. ऑगस्टीन फ्रेस्नेलने हा सिद्धांत प्रभावीपणे सिद्ध केला.
 
या फ्रेंच शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं की लहान लहान बर्हिगोल लोलक जर मधमाशीच्या पोळ्याच्या आकारात जोडली तर त्याने तिरक्या प्रकाश रेषाही सरळ दिशेने वळवल्या जाऊ शकतात.
 
फ्रेस्नेलची ही रचना भूमितीमधल्या प्रकाशाच्या एका मुख्य सिद्धांतावर आधारित होती. याच्यानुसार जेव्हा प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात (म्हणजे हवेतून काचेत आणि मग काचेतून पुन्हा हवेत) तेव्हा त्यांची दिशा बदलते.
 
या फ्रेस्नेल लेन्समुळे लाईटहाऊसमधून येणारा उजेड त्याच्या मूळ स्रोतापेक्षा प्रखर बनला. हा उजेड आता दूरवरूनही दिसत होता.
 
फ्रेस्नेलने ही प्रणाली पहिल्यांदा फ्रान्समध्ये आधीपासून महत्त्वाच्या असणाऱ्या कॉर्डोन लाईटहाऊसमध्ये लावली.
 
कॉर्डोनच्या जवळचा समुद्र हा वाकडातिकडा किनारा आणि खलाशांना चकवणाऱ्या उभ्या दगडांसाठी ओळखला जातो.
 
1860च्या दशकापर्यंत लहान बंदरांपासून ते समुद्रांतल्या मोठ्या दीपस्तंभांपर्यंत सगळीकडे फ्रेस्नेल लेन्स बसवण्यात आली.
 
कॉर्डोनचे पहारेकरी
कॉर्डोन लाईटहाऊसला चार पहारेकरी आहेत पण एकावेळी दोनच जण कामावर असतात. दर आठवड्याला त्यांची ड्युटी बदलते.
 
याच पहारेकऱ्यांपैकी एक मिकाईल नेव्हू म्हणतात, "प्रत्येक लाईटहाऊसचं एक वैशिष्ट्यं असतं."
 
कॉर्डोन लाईटहाऊसचा प्रकाश येत-जात रहातो. फ्रेस्नेल लेन्सच्या दिशेने बोट दाखवत नेव्हू सांगतात, "दर 12 सेकंदांमध्ये इथे तीनदा दिवा लागतो."
 
कॉर्डोनचं भिंग फिरत असल्याने याचं पॅनल एकवटलेल्या प्रकाशाची रेषा तयार करतं जी अनेक मैलांवरचे खलाशीही पाहू शकतात.
 
दक्षिण दिशेला लाल रंगाचा प्रकाश जातो. पश्चिमेला हिरवा किंवा पांढरा प्रकाश दिसतो.
 
प्रकाशाचा रंग समुद्रातल्या जहाजाच्या आकारानुसार वाहतूक नियंत्रित करतो. हिरवा रंग हा वाहतुकीच्या मुख्य मार्गाचा दिशादर्शक आहे. या मार्गावरून मोठी व्यावसायिक जहाजं जातात.
 
लाल रंग हा दक्षिणेकडील मार्गाचा संकेत आहे जिथून लहान आणि हलकी जहाजं जातात.
 
कॉर्डोन हे फ्रान्समधलं शेवटचं दीपगृह आहे जिथे राखणदार रहातात. एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान इथे सामान्य लोकांनाही जाता येतं.
 
इथला प्रकाश दिवस-रात्र पडत राहील याची खात्री पहारेकरी करतात आणि टॉवरसोबतच आसपासच्या जागांचीही देखरेख करतात.
 
2002मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केलं.
 
लाईटहाऊसचे पहारेकरी समाजापासून आणि कुटुंबापासून दूर एकांतात राहतात. पण तरीही ते सतर्क असतात.
 
बेनॉयट जेनोरिये गेल्या 8 वर्षांपासून या लाईटहाऊसचे राखणदार आहेत. या नोकरीतली सगळ्यांत कठीण गोष्ट कोणती, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की याचं उत्तर सगळ्या पहारेकऱ्यांसाठी वेगवेगळं आहे.
 
ते म्हणतात, "हवामानातले बदल कठीण असतात. मग रोजची काम असतात. थंडी पडते... खरंतर थंडीच्या मोसमात इथे आराम असतो कारण कोणी पर्यटक इथे येत नाहीत."