शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:46 IST)

…म्हणून औरंगजेबानं शाकाहारी जेवण घ्यायला सुरुवात केली

सलमा हुसैन

मुघल बादशाहांना मांसाहार फार आवडायचा, असा एक समज आहे.
 
मुघलकालीन भोजनाचा विषय निघताच चिकन, मटण आणि मासे यांचा उल्लेख होतो.
 
मात्र, इतिहासाची पानं उलटली तर एक गोष्ट लक्षात येते की मुघल बादशाह अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांना हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या अधिक आवडायच्या.
 
बादशाह अकबर उत्कृष्ट शिकारी होते. मात्र, मांसाहार त्यांना फारसा पसंत नव्हता.
मात्र, एका मोठ्या साम्राज्याची धुरा सांभाळण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ते नियमित मांसाहार करायचे.
आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते ठरवून शुक्रवारी मांसाहार टाळायचे. हळूहळू त्यात रविवारचाही समावेश झाला.
 
पुढे प्रत्येक महिन्याची पहिली तारीख, मार्चचा पूर्ण महिना आणि ज्या महिन्यात त्यांचा जन्म झाला तो ऑक्टोबर महिना, यातही त्यांनी मांसाहाराचा त्याग केला.
 
जेवणाची सुरुवात ते दही-भाताने करायचे.
 
अबूल फजल बादशाह अकबरांच्या नवरत्नांपैकी एक होते. त्यांनी 'ऐने-ए-अकबरी' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की बादशाह अकबरांच्या स्वयंपाकघरात तीन प्रकारचं जेवण तयार व्हायचं.
 
पहिला स्वयंपाक म्हणजे ज्यात मांस नसायचं. याला 'सुफी खाना' म्हटलं जाई.
 
दुसऱ्या प्रकारात मांस आणि भात एकत्र शिजवलं जाई.
 
तिसऱ्या प्रकारात तूप आणि मसाला लावून तयार केलेलं मांसाहारी जेवण.
 
या वर्णनावरून बादशहा अकबर यांची पहिली पसंती डाळ आणि भाज्यांना असायची, हे लक्षात येतं.
बादशाह अकबर यांच्याप्रमाणेच जहांगीर यांनाही मांसाहार फार आवडायचा नाही.
 
ते आठवड्यातले रविवार आणि गुरुवार हे दोन दिवस पूर्णपणे शाकाहारी जेवण घ्यायचे.
 
आठवड्यातले हे दोन दिवस त्यांनी मांसाहार तर सोडलाच. इतकंच नाही तर या दोन दिवसात जनावरांच्या कत्तलीवरही त्यांनी बंदी घातली होती.
 
यावरून मुघल बादशाहांची धार्मिक सहिष्णुता अधोरेखित होते. राजाच्या स्वभावानुसार स्वयंपाकी भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत.
 
फळांच्या शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांवर लावण्यात येणारा करही माफ करण्यात आला होता.
 
विशेष म्हणजे पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवणारे औरंगजेब त्यांच्याही एक पाऊल पुढे होते.
 
तरुण वयात त्यांना मुर्ग-मसलम फार आवडायचं.
औरंगजेब यांच्याविषयी माहिती घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की ते खवय्ये होते. आपल्या मुलाला लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, 'तुझ्या घरी खाल्लेली खिचडी आणि बिर्याणीची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळतेय. बिर्याणी बनवणारा स्वयंपाकी सुलेमानला माझ्याकडे पाठव, असं मी तुला लिहिलं होतं. पण, त्याला शाही स्वयंपाकघरात रुजू होण्याची परवानगी मिळाली नाही. आणखी कुणी जो त्याच्यासारखंच उत्तम जेवण बनवत असेल आणि तुझ्याकडे असेल तर त्याला पाठव. चविष्ट जेवण मला अजूनही आवडतं.'
 
मात्र, ताज (मुकुट) चढवताच ते लढायांमध्ये इतके व्यग्र झाले की उत्कृष्ट, चविष्ट जेवण विसरून गेले.
 
पण, मांसाहारापासून दूर राहणे, ही सवय त्यांना लागली ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांचा टेबल साध्या, शाकाहारी जेवणाने सजलेला असायचा. त्यांचे स्वयंपाकीही हिरव्या भाज्या, फळभाज्या यांच्यापासून उत्तमोत्तम आणि नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करायचे.
 
औरंगजेब यांना ताजी फळं फार आवडायची. त्यातही आंबा त्यांना सर्वात प्रिय होता.
 
औरंगजेब भारतातले एक शक्तीशाली राजे होते. त्यांचं साम्राज्य उत्तरेत काश्मीरपासून दक्षिणेच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि पूर्वेकडे काबूलपासून ते पश्चिमेला चटगावपर्यंत पसरलेलं होतं. त्यांनी ते सर्व मिळवलं ज्यासाठी त्यांनी युद्ध केलं.
 
मुघलांचं धाडस आणि शौर्य औरंगजेब यांच्यातही पुरेपूर होतं. तरुणवयात त्यांना शिकार करायला आवडायचं. मात्र, उतारवयात त्यांनी शिकारीला 'बेकार लोकांचं मनोरंजन' म्हटलं.
 
एका राजाने मांसाहाराचा त्याग करणं, खरंच आश्चर्याची बाब आहे. गव्हापासून बनवलेले कबाब आणि चण्याच्या डाळीचा पुलाव त्यांना फार आवडत.
 
पनीर कोफ्ते आणि फळांपासून बनवलेले पदार्थ खरंतर औरंगजेब यांचीच देण आहे.
 
(सलमा हुसैन खाद्यतज्ज्ञ आणि इतिहासकार आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये त्या खाद्य सल्लागार म्हणूनही काम करतात.)