सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (23:22 IST)

कोरोना व्हायरस : Neocov काय आहे? शास्त्रज्ञांनी याबद्दल धोक्याचा इशारा का दिला?

वटवाघळांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक प्रकार मानवी शरिरात दाखल होऊ शकतो, अशी भीती चीनमधील काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
यासंदर्भात PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, चीनमधील वुहान येथील शास्त्रज्ञांनी वरील शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या कोव्हिड साथीला कारणीभूत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार वुहान शहरातूनच झाला होता. वुहान या शहरातच चीनचं विषाणू संशोधन केंद्र आहे.
 
वुहानच्या चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस अँड वुहान युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी म्हटलं की, निओकोव्ह (NeoCov) हा सध्या तरी दक्षिण आफ्रिकेतल्या काही वटवाघुळांमध्येच आढळत असून त्यांच्यातच पसरत आहे.
 
सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा हा प्रकार 2013 मध्ये आढळून आला होता. Middle East Respiratory Syndrome (MERS) या आजाराशी संबंधित हा प्रकार असल्याचं BioXriv या जर्नलमध्ये सांगण्यात आलं आहे.
 
पण इतर संशोधकांनी अद्याप या अभ्यासाचं विश्लेषण आणि चिकित्सा केलेली नाही, त्यामुळे या व्हायरस प्रकाराबाबत स्पष्ट अशी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
 
BioXriv मधील माहितीनुसार, जर या व्हायरसचे आणखी म्युटेशन झाले तर तो मानवासाठी घातक ठरू शकतो. हा व्हायरस दुसऱ्या वटवाघुळांमध्ये पसरायला वटवाघुळांमधल्या ACE 2 नावाच्या रिसेप्टर प्रोटीनचा आधार घेतो.
 
याचं म्युटेशन झालं तर हा व्हायरस मानवांमधल्या ACE 2 रिसेप्टर प्रोटीनलासुद्धा चिटकू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
पण शास्त्रज्ञांनी अशी भीती का व्यक्त केली, हा प्रश्न उपस्थित होतो.
 
सध्याचा Sars-CoV2 म्हणजे कोव्हिड-19चा कोरोना व्हायरस ज्या प्रकारे आतापर्यंत म्युटेट झालाय, खासकरून ओमिक्रॉनच्या बाबतीत, ते पाहता जर तसंच म्युटेशन या NeoCov कोरोना व्हायरसमध्ये झालं तर हा धोका उद्भवू शकतो.
 
पण असं खरंच शक्य आहे का? महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.
 
त्यांच्या मते, "हा निओकोव्ह जुन्या MERS Covशी संबंधित आहे, DPP4 रिसेप्टर्सचा वापर करूनच पेशींमध्ये प्रवेश करू शकतो."
 
"हा व्हायरस वटवाघळांमधले Ace2 रिसेप्टर्स वापरूनच संसर्ग पसरवू शकतो, पण म्युटेशन झाल्याशिवाय तो मानवामधले Ace 2 रिसप्टर वापरू शकत नाही," असं डॉ. जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.