रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

...तर अन्न हे अमृतच समजा

प्रिय गोडूलीस,
 
अनेक उत्तम आशीर्वाद
 
काल दीप्तीच्या आई-बाबांकडे गेलो होतो. मी, बाबा, बिट्‌टू, संजय सगळेच होतो. विशेष म्हणजे दीप्तीचे काकाही होते. त्यांचीही भूमिका आम्ही समजावून घेतली. त्यांच्या दृष्टीने त्यांचे म्हणणे बरोबर होते. त्यांच्या जवळच्या मित्राच्या घरी तशी घटना घडली होती. त्यांची सून त्यांच्या जातीची नव्हती, तो आंतरजातीय विवाह होता. घरी इतर आवडीनिवडींबरोबर मांसाहारी जेवण आले. घरातले सर्वच नाराज झाले. शेवटी मुलगा बायकोला घेऊन वेगळा राहू लागला. घरातला आनंद हरवला. 
 
आम्ही काकांचे मत समजावून घेतले. इथे तसे काही होणची शक्यता नव्हतीच कारण आपणच संपूर्ण शाकाहारी आहोत व इतर राहणीमान व जीवनपद्धतीही मिळती जुळती आहे. आणि शेवटी दोन मने जुळली तर एकमेकांसाठी त्याग तर केलाच पाहिजे. एकमेकांच्या मतांचा, आवडीनिवडीचा आदरही व्हायला हवा. सात्विक आवडीनिवडी आग्रहपूर्वक जोपासाला हव्यात.
 
काकांबरोबर भरपूर गप्पा झाल्या. बिट्‌टूचा स्वभाव त्यांनाही आवडला. त्यांच्या मनातली अढी निघून गेली. असो.
 
लग्नाआधी साखरपुडा करायचा ठरला आहे. तुला कधी वेळ आहे? कुठली तारीख तुला सोयीची आहे?
 
लवकर कळव हो.
 
'शाकाहार' या विषयावर दीप्तीचे काका भरभरून बोलत होते. अन्न ताजे असावे, सात्विक असावे, पौष्टिक असावे, शाकाहारी असावे अशी सुरूवात करून त्यांन 'अन्न हे पूर्णब्रह्म' आहे पर्यंत सगळी माहिती सांगितली. 
 
हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, गाजर, पपई, आंबा, केळी, स्ट्रॉबेरी इतर फळे, फळभाज्या आदींचे सेवन करावे. अन्न केवळ शाकाहारी असून किंवा प्रोटिन्स, व्हिटॅमीनयुक्त असून चालत नाही तर ते चांगल्या शुध्द, पवित्र, आनंदी भावनेने बनवलेले असावे व अन्नाचे सेवन करतानाही आपल्या मनातील भाव तशाच प्रकारचे असायला हवेत. हे सांगत त्यांनी सत्यनारायण पूजेसाठी बनविलेला शिरा व इतर वेळेस बनविलेला शिरा याच्या चवीतला फरक सांगितला. 
 
पूजेसाठी बनविलेला शिरा आपण अत्यंत भक्तिभावाने, आदराने, प्रेमाने, शुध्द मनाने बनवितो. तो नैवेद्य असतो. देवापुढे नैवेद्य ठेवला जातो व नंतर प्रसाद म्हणून तेवढ्याच भक्तिभावाने तो सेवन केला जातो. तो प्रसाद काही अलौकिक आनंद देऊन जातो. त्याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळते. प्रसाद आपण सर्वांना वाटून मग खातो. त्यामुळे सहकार्य, सहयोग व आपलेपणाचीही भावना त्यात मिसळली जाते. प्रसाद परत परत खावासा वाटतो. आपले मन तो प्रसन्न करून जातो. शिर्‍याचा प्रसाद होण्यामागे मनातील शुध्द पवित्र आनंदी भक्तिभावच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
 
'जसे अन्न-तसे मन' या विषयीही काकांनी अनेक बाबी सांगितल्या. जसे आपण अन्न खातो तसे आपले शरीर तर बनत असतेच परंतु तसेच आपले मनही तयार होत असते. मनाची शक्ती ही अगाध शक्ती आहे, असे म्हटले जाते. सात्विक शुध्द अन्न सुदृढ सशक्त मन तयार करते. सशक्त मन हे यशाचे, आनंदाचे प्रवेशद्वार असते. 'पण काका मग रोजच नैवेद्य दाखवायचा का?' बिट्‌टूने मध्येच प्रश्न विचारला. काका म्हणाले, हो बिट्‌टू, काय हरकत आहे. आपली भारतीय संस्कृती सांगतेच ना की आपण अन्न सेवन करण्यापूर्वी काही घास देवासाठी, काही गाईसाठी, काही पक्ष्यांसाठी काढून ठेवावेत. मग आपण भोजन करावे. रोज शुध्द, सात्विक मनाने स्वयंपाक तयार करून देवाला नैवेद्य दाखवणे यात काही फारसा वेळ जाणार नाही. 
 
यावेळी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून भोजन घेतले. भोजन सेवन करतांना आनंदी गप्पाटप्पा झाल्या   तर अन्न हे अमृतच समजा. हं कामाच्या घाई गडबडीत दोन्ही वेळा एकत्र जेवण शक्य नसेल तर एकवेळ तरी साधावी व सुट्‌टीच दिवशी तर दोन्ही वेळा सहज शक्त असते ना.
 
काकांची ही महत्त्वपूर्ण माहिती ऐकून आम्ही आनंदलो व त्यांना धन्यवाद देतच घराकडे परतलो. असो, मंजिरीला गोड गोड पापा व सर्वांना आदरुक्त नमस्कार सांगणे.
 
कळावे. तुझीच, सौ. आई.
 
डॉ. सुधा कांकरिया