बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (12:24 IST)

समर्थ मठात नाही, देवळात नाही, हृदयात बसतो

एक फार मोठा संन्यासी गुरु होता. त्याचे अनेक शिष्य होते. 
 
एक दिवस गुरूला आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याची लहर आली. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना प्रसाद म्हणून एकेक केळे दिले. 
 
गुरु म्हणाले, शिष्यानो! हे केळे मी तुम्हाला प्रसाद म्हणून दिले आहे. ह्या केळ्यामध्ये माझे सर्व सामर्थ्य आणि सिद्धी बंधिस्थ आहेत. हे केळे खाल्यावर तुम्हासर्वाना माझ्याकडे असणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होतील. फक्त एकच अट आहे. ती अशी, की हे केळे अश्या ठिकाणी जावून खा, जिकडे तुम्हाला कोणी बघणार नाही. असे म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना निरोप दिला.
 
सर्व शिष्य वेगवेगळ्या दिशांना पांगले. कोण डोंगरावर गेले तर काही दरीत. काही झाडाखाली तर काही शेतात. थोडयावेळाने सर्व शिष्य परतले. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडत होता. प्रत्येकजण आपण कसे सगळ्यांपासून लपवून केळे खाल्ले हे सांगण्यात गुंतला होता.
 
तेवढयात गुरुचे आगमन झाले. स्थानापन्न झाल्यावर त्यांनी सर्वाना सविस्तर वृतांत कथन करण्यास सांगितले. सगळ्यांनी आपापली कथा ऐकवली. एक शिष्य मात्र केळ हातात घेऊन मान खाली घालून गप्प बसला होता. गुरु त्याच्या जवळ आले आणि त्यांनी प्रेमाने त्याला विचारले, बाळा काय झाले! तू केळे का नाही खाल्लेस?
 
त्यावर तो शिष्य म्हणाला,गुरुदेव! मी सगळ्या जागा शोधल्या. सगळ्यांपासून स्वतःला लपवले परंतु तुमच्यापासून स्वःताला नाही लपवू शकलो."जिकडे जातो तिथे माझा गुरुदेव माझ्याबरोबर होते मग मी हे केळे कसे खाणार?"
गुरूने शिष्याला कडकडून मिठी मारली. 
 
तात्पर्य : 
माझा समर्थ मठात नाही, देवळात नाही तो माझ्यात आहे. 
तो माझा गुरु आहे आणि सतत माझ्या बरोबर आहे. 
किंबहुना तो माझा, त्याच्यावर असलेला हक्क आहे. 
त्याला हारतुरे, पेढे, दक्षिणा, अभिषेक, उपवास ह्याची काही काही आवश्यकता नाही. 
त्याला हवी आहे निस्वार्थी भक्ती आणि अखंड नामस्मरण.
 
-सोशल मीडिया