मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2024 (00:18 IST)

उषा वेन्स: अमेरिकन निवडणुकीत चर्चा होत असलेल्या 'या' महिलेचं भारत कनेक्शन काय?

usha vance
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जे.डी. वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार हीच वेन्स यांची एकमेव ओळख नाही.
ते ओहायोचे खासदार, लेखक, गुंतवणूकदार तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
जे.डी वेन्स यांच्या पत्नीचा भारताशी संबंध आहे.
या लेखाच्या माध्यमातून आपण जे.डी. वेन्स यांचं भारतातील कनेक्शन, त्यांची पत्नी उषा, त्यांचं व्यक्तिमत्व यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
वेन्स यांचं भारताशी कनेक्शन
जे.डी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय वंशाच्या आहेत. 2013 मध्ये येल विद्यापीठात वेन्स आणि उषा यांची भेट झाली. 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं.
 
या दाम्पत्याला इवान, विवेक आणि मीराबेल अशी तीन अपत्यं आहेत.
 
उषा यांचे आई-वडील अमेरिकेला स्थायिक झाल्याने उषा सॅन डियागोमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या.
 
वेन्स आणि उषा यांची पार्श्वभूमी सुद्धा वेगळी आहे. येल विद्यापीठातुन पदवी मिळवल्यानंतर उषा यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. तसेच सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॅान रॉबर्ट्स यांची क्लर्क म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
 
सध्या त्या वकील म्हणून कार्यरत आहेत. जे.डी. वेन्स हे सतत उषा यांचे कौतुक करत असतात. येल विद्यापीठातील माझी 'आध्यात्मिक गुरू' असा उषा यांचा उल्लेख ते करतात.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत उषा म्हणतात, मला जे.डी. वर विश्वास आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, आमच्या आयुष्यात आता पुढे काय होईल ते आता पाहू.
 
सीएनएनच्या रिपोर्टनुसार जे.डी वेन्स यांनी उषा यांच्याबद्दल लिहिलं होतं की, "उषाला अशा प्रश्नांची जाण आहे जे मला माहितीही नसतात. उषा मला नेहमी अशा संधीचा लाभ घेण्यास प्रेरित करते, ज्यांच्याबद्दल मला माहिती नसते."
 
जे.डी वेन्स म्हणतात, "उषा काय तोडीचं व्यक्तिमत्व आहे याची लोकांना कल्पना नाही. ती हजार पानांचं पुस्तक काही तासांमध्ये वाचून काढू शकते."
 
ट्रम्प यांच्यावरील जे.डी. वेन्स यांची जुनी विधानं
जे.डी. वेन्स आता उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, पण आधी ते ट्रम्प यांच्यावर सतत टीका करायचे.
 
"मला ट्रम्प आवडत नाहीत"
" अरे देवा,काय वेडा आहे ट्रम्प"
" मला ट्रम्प हे निंदनीय वाटतात"
अशा प्रकारे जे.डी. वेन्स यांनी मुलाखतीतून असेच आपल्या एक्स अकाऊंटवरून 2016 साली ट्रम्प यांच्यावर टीका केली होती
 
'हिलबीली एलीगी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर जे.डी वेन्स यांना प्रसिद्धी मिळू लागली. या पुस्तकावर एक सिनेमासुद्धा तयार करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर तो उपलब्ध आहे.
 
"मला असं वाटतं ट्रम्प हा सनकी आहे, तो अमेरिकेचा हिटलर आहे," असं 2016 मध्ये आपल्या सहकाऱ्याला केलेल्या खासगी मेसेज मध्ये जे.डी वेन्स म्हणाले होते. पण काही काळानंतर वेन्स आणि ट्रम्प एकत्र काम करू लागले.
परंपरागत मतांचा आकडा पाहिला आणि उत्तर मध्य क्षेत्रामुळे रिपब्लिकन पक्षाला आशा आहे की मतदानाच्या प्रमाणात वाढ होईल.
 
जे.डी वेन्स हे ओहायोमधून पहिल्यांदा खासदार झाले. 2028 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असतील असंही बोललं जातं. तसेच बदल हा जे.डी वेन्सच्या सवयीचा भाग आहे असं बोललं जातं.
 
'या' पुस्तकामुळे वेन्स झाले अतिशय लोकप्रिय
जेम्स डेविड बोमैन उर्फ जे.डी वेन्स यांचा जन्म ओहायो मध्ये झाला असून, ते लहान असतानाच त्यांचे वडील घर सोडून गेले. जे.डी वेन्स यांचं आजी-आजोबांनी संगोपन केलं. ते त्यांना मम्मी-पप्पा म्हणायचे. आपल्या 'हिलबिली एलीगी' या पुस्तकात वेन्स आजी-आजोबांबाबत आत्मीयतेने लिहिलं आहे.
 
जे.डी वेन्स हे ओहायोच्या मिडिल टाऊनचे आहेत. पण आपल्या कुटुंबीयाचं मूळ पर्वतीय भागातील एपलाचिया असल्याचे सांगतात. हा अमेरिकेतील सर्वांत गरीब भागांपैकी एक आहे.
 
जे.डी वेन्स यांनी पुस्तकात आपल्या मित्रांविषयी तसेच परिवाराने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांविषयी लिहिलं आहे. जे.डी वेन्स यांनी बरेचदा परंपरागत मार्गांचाही अवलंब केला आहे.
त्यांच्या मते, हे लोक सरकारी मदतीवरील आश्रित, खर्चिक आणि आळशी होते.
 
वेन्स लिहतात की, एपलाचिया या भागातील लोक परस्थिती कायम बिकट असल्याचं दाखवतात ही लोक अशा संस्कृतीतून येतात तिथे एखाद्या परिस्थितीतून बाहेर येण्यापेक्षा त्यापासून पळण्याकडे कल असतो.
 
या पुस्तकात वेन्स लिहितात की, सत्य कटू असतं आणि पहाडी लोकांसाठी सगळ्यात कटू सत्य तेच आहे जे त्यांनी स्वत:ला सांगितलं पाहिजे.
 
बेस्टसेलर ठरलेल्या या पुस्तकाने वेन्स यांची वेगळी ओळख निर्माण केली.
 
लेखक ते समीक्षक : एक प्रवास
'हिलबिली एलीगी' पुस्तकामुळे जे.डी सर्वात जास्त खप होणाऱ्या लेखकांच्या यादीत तर आले पण समीक्षक म्हणूनही त्यांना कार्यक्रमाला बोलावणं येवू लागलं. श्वेतवर्णीय आणि नोकरदार वर्गाबद्दल ट्रम्प जे बोलतात त्यावर बोलावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा होऊ लागली. अशा वेळी तेव्हा जे.डी वेन्स ट्रम्पवरती टीका करण्याची संधी सोडत नव्हते.
 
2016 मध्ये एका मुलाखतीत जे.डी वेन्स म्हणाले होते की, "मला वाटतं या निवडणुकीचा श्वेतवर्णीय नोकरदार वर्गावर वाईट परिणाम होतोय. लोकांना एकमेकांकडे बोट दाखवण्याचं कारण मिळत आहे. कधी मॅक्सिकन शरणार्थींवर तर कधी चीनी व्यापाऱ्यांवर."
असा झाला राजकारणात प्रवेश
2017 मध्ये वेन्स ओहायोला परत आले आणि एका कंपनीमध्ये काम करू लागले. वेन्स राजकारणात येणार अशा चर्चा आधीपासून सुरू होत्या. पण या चर्चा वास्तवात तेव्हाच आल्या जेव्हा ओहायो मधून रिपब्लिकन खासदार रॉब पोर्टमॅन यांनी 2022 साली निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. वेन्स यांचा प्रचार हा फारच संथ गतीने सुरू झाला पण वेन्स यांच्या जुन्या बॅासने त्यांना एक कोटी डॅालरची मदत केल्यानंतर प्रचाराला गती प्राप्त झाली.
 
पण ट्रम्प यांच्याविषयी केलेली विधानं त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत होते. ओहायो शहरात रिपब्लिकन पक्षाचे अधिक समर्थक असल्याने वेन्स यांनी आपल्या जुन्या विधानांवर माफी मागितल्यानंतर त्यांना ट्रम्प समर्थकांचं पाठबळ मिळालं.
 
या सर्व प्रक्रियेत 'अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या' राजकारणात वेन्स हे महत्त्वाचे ठरू लागले. त्यांनी ट्रम्प यांचा अजेंडा पुढे रेटण्यास सुरूवात केली. याचाच परिणाम म्हणून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या ताकदवान पदापर्यंत पोहचण्याच्या शर्यतीचा ते भाग बनले आहेत.
(ज्यूड शिरीन, माइक वेल्डिंग आणि बीबीसी मुंडोच्या वार्तांकनासह.)
 
Published By- Priya Dixit