शाळेचा मनमानी कारभार, विद्यार्थी,पालकांसाठी जाचक अटी
पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर पालकांवरही अशा जाचक अटी घातल्या आहेत. यात विद्यार्थिनींनी सौदर्य प्रसाधने वापरू नयेत, टॅटू काढू नयेत, लिपस्टीक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स वापरायचे नाहीत, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत, कानातलेही जास्त मोठे नकोत आणि त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरीच असावा, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, प्रशासन आणि माध्यमांसोबत पालकांनी संवाद साधू नये आदी अटींचाही यात समावेश आहे.
माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली जाहीर केली आहे. या अटींचा भंग केल्य़ास पालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र लिहून आणण्याची सक्ती शाळेने केली आहे.