सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 22 जुलै 2020 (15:48 IST)

सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला

करोना संकटाच्या काळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने तर नवा उच्चांक गाठला आहे.
 
चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोग्रॅम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति 10 ग्रॅमसाठी 50 हजार रुपयांचा आकडा ओलांडला. बुधवारी भारतीय बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे दर 61,200 रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.
 
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर बुधवारी (एमसीएक्स) सकाळी चांदीचे दर 58,000 रुपये होते, थोड्याच वेळात यात वाढ झाली आणि दर 61,200 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले. तर सोन्याच्या दरांनीही 50 हजाराचा आकडा ओलांडला. बुधवारी एमसीएक्सवर सुरूवात होताच सोन्याचे दर 49,931 रुपयांवरुन थेट 50,020 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.
 
करोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीतील गुंतवणूक वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर, अनलॉकनंतर इंडस्ट्रीयल डिमांड वाढल्यामुळेही चांदीच्या दरात वाढ झाली असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.