ग्राहक न्यायालयाचा दणका, सुझुकी ग्राहकाला 50 हजार देणार
ग्राहकाला सारखी नादुरुस्त होणारी कार विकल्याबद्दल मारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल 50 हजार रुपये आणि खराब सुटे भाग बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात गुजरातमधील पोरबंदर येथील नलीनीभाई कनानी यांनी मार्च 2011 मध्ये मारुतीची स्विफ्ट ही कार घेतली होती. कनानी यांची कार दुरुस्त करताना ती वॉरंटीमध्ये होती. मात्र, कंपनीने त्यांना वॉरंटी न देता दुरुस्तीचे पैसे उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ही कार केवळ 17 हजार किमी चालली होती. या विरोधात कनानी यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच, पोरबंदर येथे धाव घेतली होती. मंचाने कंपनीला त्यांना कार बदलून देणे किंवा कारची किंमत 5.41 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले. तसेच मानसिक त्रासापोटी कनानी यांना 3 हजार रुपयेही देण्यास बजावले होते. आयोगाने मारुती सुझुकीला पोरबंदर ग्राहक मंचाच्या निर्णयातून काही प्रमाणात दिलासा देत कार मोफत दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 15 सप्टेंबरपर्यंत ही कार ग्राहकाला परत करण्याबरोबरच 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.