बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (20:58 IST)

इन्स्टाग्राम हे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे का?

शिओना मॅक्कुलम
झोपेतून उठायचं, फोन हातात घ्यायचा, इन्स्टाग्राम ओपन करायचं आणि स्क्रोल करायला सुरुवात करायची.
 
आपल्यापैकी अनेकांसाठी दिवसांची सुरुवात ही काहीशी अशीच होते. पण या अॅपचा आपल्या मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो?
 
सोशल मीडियाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत इन्स्टाग्राम हे अधिक धोकादायक असल्याचा इशारा फेसबुकमधील व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी दिला होता. कंपनीनं स्वतः केलेल्या संशोधनात ते हानिकारक ठरू शकतं असं समोर आल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला होता.
 
गुंतागुंतीच्या किंवा कठीण समस्या जाणून घेण्याबाबतची वचनबद्धता संशोधनावरून दिसून आल्याचं त्यावेळी इन्टाग्रामनं म्हटलं होतं.
राजकीय संबंध असलेले लोक सातत्यानं सोशल मीडियाचा अभ्यास करत असतात. बीबीसीनं पाच जणांशी बोलून इन्स्टाग्रामबाबतचे त्यांचे अनुभव जाणून घेतले आहेत.
 
कम्युनिटी निर्माण करणे
दानी यांचं इन्स्टाग्रामबरोबरचं नातं प्रेम आणि द्वेष असं दुहेरी आहे. साऊथ वेल्समधील 29 वर्षीय दानी या माध्यमातून उदरनिर्वाह चालवतात. ट्रान्स समुदायातील सदस्यांनी ऑनलाईन एकमेकांशी संपर्क साधावा म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी कम्युनिटी तयार केली आहे.
 
पण त्यांच्या दिसण्यावरून त्यांना अनेकदा युझर्सच्या गैरवर्तनाचा सामना करवा दानी यांना लागतो.
 
"इन्स्टाग्राम हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आणि सर्वात मोठा शापदेखील आहे," असं दानी बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.
"तुम्ही जेव्हा ट्रान्सजेंडर असता आणि तुमचं खातं (अकाऊंट) खासगी नसून सार्वजनिक असतं, तेव्हा अशा गैरवर्तन करणाऱ्यांना मोकळा मार्ग सापडतो. त्यात मला मिळालेल्या काही द्वेषयुक्त प्रतिक्रिया तर अगदी मन खच्ची करणाऱ्या होत्या.''
 
"अत्यंत निषेधार्ह अशा प्रतिक्रिया होत्या. कोणीतरी मला एक थ्रेड (एकमेकांशी संबंधित मॅसेजेस) पाठवलं होतं. त्याठिकाणी माझ्या फोटोचा वापर करून अत्यंत वाईट प्रकारे खिल्ली उडवली जात होती," असं दानी यांनी सांगितलं.
 
"लोकांच्या जीवनशैलीबाबत किंवा शरीराबाबत तसंच सामाजिक तुलनेबाबतचा कंटेट यावर आहे. मुलांचा विचार करता हे अत्यंत वाईट ठरत आहे," असं फ्रान्सिस हॉगेन यांनी खासदार आणि लॉर्ड्सच्या संयुक्त समितीला इन्स्टाग्रामबाबत सांगितलं होतं.
 
दानी यांनी दारुच्या व्यसनावर मात केली आहे. मात्र, सोशल मीडियाचं व्यसन काय असतं, ते चांगलंच जाणवत असल्याचं त्या म्हणाल्या.
 
"मी काही वर्षांपासून यात रुळले आहे. मात्र, ज्यांना सोशल मीडियाचं व्यसन लागतं, त्यांच्या दृष्टिनं इन्टाग्राम अत्यंत वाईट असल्याचं, मला जाणवतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आणखी-आणखी हवं असल्याची जशी भावना असते, तसंच याबाबतही घडतं."
 
इन्स्टाग्रामची मुख्य कंपनी मेटाचे ग्लोबल अफेयर्सचे उपाध्यक्ष सर निक क्लेग यांनी मात्र या प्लॅटफॉर्मचा बचाव केला आहे. बहुसंख्य प्रमाणात किशोरवयीन मुलींना याचा वापर करणं आवडतं, असं त्यांनी म्हटलं.
 
इन्स्टाग्रामचा हानिकारक वापर होऊ नये यासाठी कंपनी काही नवी साधनं आणणार आहे. त्यात 'टेक अ ब्रेक' या फिचरचा समावेश असेल. त्यामुळं तरुण यूझर्सना लॉग ऑफ करण्याबाबत सूचना केली जाईल, असं ते म्हणाले.
 
शरीराबाबत न्यूनगंड
हॅना सोशल मीडियावर रोज 6 ते 10 तास घालवतात. अगदी किशोरवयात असल्यापासून त्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
 
स्कॉटलँडच्या अयर (Ayr) मधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय हॅना यांचं सोशल मीडियाच्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर खातं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट आणि टिकटॉक या सर्वांचा त्यात समावेश आहे.
 
"सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सोशल मीडियाचे सर्व नोटिफिकेशन पाहण्याची वाईट सवय मला लागली आहे," असं हॅना सांगतात.
 
"त्याशिवाय झोपण्यापूर्वी सर्वात शेवटीदेखील मी तेच काम करत असते. माझा संपूर्ण दिवस हा सोशल मीडियाच्या अवती भोवती फिरणाराच असतो."
 
"मला नक्कीच टिकटॉकचं व्यसन लागलेलं आहे. मी एकावेळी किमान दोन तास सहजपणे व्हीडिओ स्क्रोल करत वेळ घालवू शकते. मी वेळ वाया घालवत आहे, याची मला जाणीव आहे. काही वेळा मी याला आवर घालण्याचाही प्रयत्न करत असते."
 
हॅना इन्स्टाग्रामवर अशा काही इन्फ्लुएन्सरना फॉलो करायच्या, ज्यांच्यामुळं स्वतःच्या शरीराबाबत त्यांना वाईट वाटत होतं.
 
"माझं शरीरही त्यांच्यासारखं असावं असं मला वाटायचं. त्यामुळं मी सडपातळ मॉडेल बनण्याची अवास्तव अशी अपेक्षा स्वतःकडून करू लागले. पण मानसिक आरोग्याला त्यामुळं मोठी हानी झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी लगेचच एक पाऊल मागं घेतलं आणि त्या सर्वांना अनफॉलो केलं," असं हॅना सांगतात.
 
आता कोणाला फॉलो करायचं यात त्यांनी बदल केला आहे. शरीराबद्दल सकारात्मकता जाणवणाऱ्या अकाऊंटला त्या फॉलो करतात.
 
"प्रत्येक जण सुंदर त्वचा किंवा सहा फूट उंच मॉडेलसारखं असू शकत नाही, याची मला जाणीव झाली. माझ्या सारख्या असलेल्या लोकांना फॉलो करायला मी सुरुवात केली. त्यामुळं शरीराबाबत माझा न्यूनगंड गेला आणि आत्मविश्वास वाढला.
 
हॅना यांनाही इन्स्टाग्रामवर काही द्वेषयुक्त प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.
 
"मी खूप जाड आहे, त्यामुळं वजन कमी करायला हवं अशा काही प्रतिक्रिया मला मिळाल्या. मी केवळ साईझ टेन आहे. पण या प्रतिक्रियांमुळं शरीराबाबत नकारात्मक भावना माझ्या मनात निर्माण झाल्या होत्या."
 
विखारी वातावरण
सोशल मीडियाच्या संदर्भातील धोक्यांची जाणीव असल्याचं उत्तर लंडनमधील हॉर्न्से स्कूल ऑफ गर्ल्समधील स्कार्लेट आणि अकाऊंट अनिसा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
स्कार्लेट 15 वर्षांची असून ती फेसबुक वगळता इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करते. फेसबुक तिच्या वयाच्या मुलांसाठी नसल्याचं तिचं मत आहे.
 
"मला आवडणाऱ्या एमा कॅम्बरलेनसारख्या फॅशन संदर्भातील कंटेंट तयार करणाऱ्या यूट्यूबर्सना मी फॉलो करते," असं ती म्हणाली.
 
"पण जेव्हा मी सौंदर्याच्या दृष्टीनं खूप उच्च दर्जाच्या कुणाला तरी पाहते, आणि त्यातही अशावेळी जेव्हा मी नुकतीच तारुण्यात प्रवेश करत आहे, तेव्हा काहीशी विचित्र स्थिती निर्माण होते. त्यांना पाहिल्यानंतर आपणही असंच सुंदर दिसायला हवं असं वाटतं आणि त्यातून असुरक्षितपणाची भावना निर्माण होते."
 
"मी असे अनेक अकाऊंट अनफॉलो केले आहेत."
 
अनिसादेखील 15 वर्षांची आहे. नकारात्मक कंटेंट टाळण्यासाठी तिनंही फॉलो करत असलेल्या अकाऊंटमध्ये बदल केला आहे.
 
पण अजूनही तिला बघायची इच्छा नसलेला असा काही कंटेंट तिला सोशल मीडियावर झळकत असतो.
 
"काही अकाऊंटद्वारे विखारी वातावरण तयार केलं जातं, हे माझ्या लक्षात आलं आहे. मी किशोरवयीन असल्यामुळं माझ्यावर मतं लादण्याचा किंना ब्रेनवॉश करण्याचा प्रकार होऊ शकतो, याकडं लक्ष द्यायला हवं," असं अनिसा म्हणाली.
 
"मुस्लीम म्हणून आमचं अत्यंत चुकीच्या पद्धतीचं सादरीकरण याठिकाणी होत असल्याचं मला वाटतं. त्यामुळं मला तसा कंटेंट दिसला तर मी अनफॉलो करते," असंही ती म्हणाली.
 
सोशल मीडियावर काही मजेदार, आनंद देणारे अनुभवही मिळतात असं या दोघींनी सांगितलं. विशेषतः मित्र-मैत्रिणींबरोबर व्हीडिओ तयार करण्यात मजा येत असल्याचं, त्या म्हणाल्या.
 
"मी रेसिपीचे व्हीडिओ पाहून अनेक पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन व्हीडिओच्या माध्यामातून मी खूप काही शिकले," असं स्कार्लेट सांगते.
 
"काही अकाऊंटद्वारे महत्त्वाची समोर न आलेली माहिती, टिप्स आणि ट्रिक्स याबरोबरच जीवनाविषयी मार्गदर्शनही केलं जातं. सगळंच वाईट आहे असं नाही. पण नकारात्मक कंटेंटचं प्रमाणं सकारात्मक कटेंटच्या तुलनेत नक्कीच अधिक आहे," असं ती म्हणाली.
 
'नकारात्मक कंटेंमुळे दूरच'
शाळेत असलेलं प्रत्येकजण इन्स्टाग्रामवर आहेच असंही नाही. 15 वर्षांच्या लिआ हिला अद्याप अकाऊंट सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही.
 
"याठिकाणी अनेक नकारात्मक अशा गोष्टी आहेत. त्यामुळं माझ्या आईच्या निर्णयावर मला विश्वास आहे," असं लिआ म्हणाली.
"माझे सर्व मित्र-मैत्रिणी सोशल मीडियावर आहेत. त्यामुळं अनेकदा मी त्यांच्यात वेगळी पडते. त्यामुळं मलाही अकाऊंट असतं तर आवडलं असतं. मात्र, मला त्याची वाईट बाजूही माहिती आहे. माझ्या मैत्रिणींना आमच्या वयाच्या मुलांनी पाहू नये असे, अनेक वाईट आणि भयानक फोटो-व्हीडिओ आल्याचं मी अनेकदा ऐकलं आहे."
 
सप्टेंबर महिन्यात मेटानं (तेव्हाचे फेसबूक) 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इनस्टाग्रामचा अनुभव घेता यावा म्हणून "इन्स्टाग्राम किड्स" नावाचं प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या योजनेला विराम दिला.
 
यासाठी पालक, तज्ज्ञ, सरकार आणि नियंत्रक या सर्वांची मते जाणून घेण्यासाठी कंपनीला वेळ लागणार असल्याचं इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोस्सेरी म्हणाले.