शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (08:53 IST)

मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू होणार

मुंबईत कोविडची तिसरी लाट नियंत्रणात आल्याने मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मार्चपासून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने मात्र कोविडबाबतचे सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्याचे आदेश राज्य शासन व मुंबई महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भातील एक परिपत्रक पालिका शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ व शिक्षण अधिकारी (प्रभारी) राजू तडवी यांनी शुक्रवारी रात्री उशिराने जारी केले आहे. त्यामुळे आता पालिका, सरकारी, खासगी आणि सर्व माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात आता मार्च महिन्यापासून पूर्ण क्षमतेने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी दिसणार आहेत.

 या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांसाठी शालेय बस, खासगी बस सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
कोविडची तिसऱ्या लाटेचा जोर असताना सर्व शाळा, महाविद्यालये आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येत होत्या. आता या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. मात्र पर्यटन मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे व पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी मार्चपासून शाळा सुरू करताना कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे अनिर्वाय असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
पालिकेने याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जात येणार आहे. तसेच,सर्व शाळा, मैदानी खेळ, शाळेचे विविध उपक्रमासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी काही नियम
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे तापमान प्रवेशद्वारातच तपासले जाईल.
2.  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण व उपस्थिती अनिवार्य असणार आहे.
 
3. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात, नियमित वर्गांच्या तासांमध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती, सहशालेय शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यास परवानगी असणार आहे.
 
4. शालेय बस/ व्हॅनमध्ये कोविड नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.
 
5. शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे मधली सुट्टी असेल व विद्यार्थ्यांना आहार घेता येणार आहे.
 
6. मात्र विद्यार्थ्यांना खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे असल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये.
 
7.  कोविड लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यासाठी पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिका शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या सहाय्याने शाळांच्या आवारात १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.