रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 24 जानेवारी 2022 (20:54 IST)

बाळासाहेब ठाकरे युतीतून बाहेर पडणार होते, पण…; नवाब मालिकांचा गौप्यस्फोट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्तावही शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र काही कारणाने त्यावेळी दोन पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. मात्र २०१९ मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले. मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
 
बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता. शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
 
२०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही मलिक म्हणाले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता फडणवीस यांना समजले आहे, परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.