शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (22:51 IST)

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेत अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिक खबरदारी घेतली जाईल, असं म्हटलं होतं. दरम्यान, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 
हेमंत नगराळे यांनी परिपत्रक जारी केलं आहे. यात नुकतीच साकीनाका पोलीस ठाणे हददीत रात्रीच्या वेळी एकटया महिलेवर अत्याचाराची घटना घडलेली असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता खालील प्रमाणे उपायोजना करण्यात याव्यात, असा आदेश काढला आहे.
 
१. साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलीसांचा प्रतिसाद १० मिनिटाचा होता. अशा घटनामध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कोणत्याही कॉल विशेष करून महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये व त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे.
 
२. पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलींग मोबाईल वाहने यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.
 
३. अंधाराच्या व निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. तसेच अशा ठिकाणी सी.सी.टी.व्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा.
 
४. निर्जन स्थळी अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरून गस्तीवरील वाहने, गस्त करणारे पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा वावर होवुन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल.
 
५. पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी. तसेच त्या ठिकाणी मोबाईल ५ गस्त ठेवावी.
 
६. गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी / अंमलदार संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी करून त्यांच्याकडे त्या ठिकाणी येण्याच्या प्रयोजनाबाबत चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
 
७. रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी/ अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योग्य ती मदत देण्यात यावी. गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.
 
८. पोलीस ठाणे हद्दीतील अंमली पदार्थांची नशा करणारे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
 
९. पोलीस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासुन उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, ट्रक व गाडयांच्या मालकांचा शोध घेवून वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगणे अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवून पुढील कारवाई करावी.
 
१०. महिलांसंबंधीत गुन्ह्यात कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा (Sexual offender list) व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.
 
११. ज्या पोलीस ठाण्यांच्या हददीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री २२.०० या ते सकाळी ०७.०० वा पर्यंत तैनात करण्यात यावं. मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकट्या येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. तसेच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा क्रमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी नमूद एकट्या महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी,
 
ज्या पोलीस ठाणे हददीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलीस ठाण्यांतील रात्री गस्तीवरील अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर भेटी द्याव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
उपरोक्त सुचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी.