गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (15:57 IST)

सीएए समर्थनासाठी मनसेचा नऊ फेब्रुवारीला मोर्चा : राज

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेले नाही, असे सांगतानाच मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर धावून जाईन आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या मुसलमानांना भारतातून हाकलून देण्यासाठी येत नऊ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.
 
गोरेगाव येथे नेस्को मैदानावर मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनला संबोधित करताना राज ठाकरे यांची तोफ धडाडली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो... अशी साद घालतच राज यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली. मी मराठी आहे आणि हिंदूही आहे. धर्मांतर केलेले नाही. माझी भाषणे तपासा त्यातही तेच ऐकायला मिळेल. हे काही मी आज बोलत नाही. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईन आणि मझ्या धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन, असा इशारा देतानाच माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. माझे विचार सरळ आणि स्वच्छ आहेत, असे राज म्हणाले.
 
जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितले? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाला, ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते असे राज म्हणाले.
 
ते येथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता. त्यावेळी विरोधात मोर्चा काढणारा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचे काम मनसेने केले. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललाय हे का विचारले नाही? असा सवाल राज यांनी केला.