सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (18:58 IST)

नरेंद्र मोदी- मुंबईला भविष्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न, शिंदे-फडणवीसांच्या काळात विकासाचा वेग वाढला

narendra modi
ANI
"आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे. मुंबई शहराला सर्वोत्तम बनवण्यात या कामांची मोठी भूमिका असणार आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन केलं.
 
"महाराष्ट्राचा विचार केल्यास आगामी 25 वर्षांत महाराष्ट्रातील अनेक शहर भारताच्या प्रगतीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्यामुळे मुंबईला भविष्य काळासाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही काळ याचा वेग मंदावला होता. पण शिंदे-फडणवीस जोडी येताच कामाचा वेग पुन्हा वाढला," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई विमानतळावर नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं.
 
वांद्रे कुर्ला संकुलातील सभास्थळी पंतप्रधानांची सभा होत आहे.
 
हा कार्यक्रम मोदींच्या हातून होऊ नये ही काही लोकांची इच्छा होती- एकनाथ शिंदे
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्याची; लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, त्यातून लोकांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं.
 
मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईचा कायापालट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, असं त्यांनी म्हटलं.
 
“ऑक्टोबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण होतं आहे. हा दैवी योग आहे.”
 
काही लोकांची अपेक्षा, इच्छा होती की हा कार्यक्रम मोदींच्या हातातून होऊ नयेत. पण नियतीसमोर काही चालत नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
 
सहा महिन्यांत हे सरकार एवढं काम करतंय, तर पुढच्या दोन वर्षांत किती काम करेल, या विचाराने काही लोकांची धडधड वाढलीये, अस्वस्थता वाढली आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
'ज्या योजनांचं भूमीपूजन केलं, त्यांचं उद्घाटनही केलं'
 
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना पंंतप्रधानांचा उल्लेख जागतिक स्तरावरील सर्वांत लोकप्रिय नेते असा उल्लेख केला.
 
“लोकप्रियतेची स्पर्धा झाल्यास मुंबई त्यात सगळ्यात वर असेल, इतकी तुमची लोकप्रियता मुंबईकरांच्या मनात आहे.”
 
“तुम्ही डबल इंजिनचं सरकार आणण्याचं आवाहन केल्यानंतर लोकांनी आपलं सरकार आणलं होतं. पण काही लोकांच्या बेईमानीमुळे जनतेच्या मनातील सरकार बनू शकलं नव्हतं.  पण बाळासाहेबांचे सच्चे अनुयायी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवल्यामुळे लोकांच्या मनातील सरकार पुन्हा येऊ शकलं. त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास आता वेगाने होऊ लागला आहे.”
 
कोव्हिड काळात नरेंद्र मोदींनी गरीब मजूरांसाठी अनेक योजना आणल्या. पण महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजना लागू केल्या नाहीत. त्यामुळे गरीब मजूरांना आवश्यक ती मदत मिळू शकली नाही, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
 
आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही 1 लाख फेरीवाले, छोटे दुकानदार यांना स्वनिधीचा पैसा देत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.  
 
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत, ज्यांनी ज्या-ज्या योजनांचं भूमिपूजन केलं, त्यांचं उद्घाटनही स्वतःच केलेलं आहे. ही नवी संस्कृती देशभरात तुमच्यामुळे आली आहे.”
 
कोणकोणत्या प्रकल्पांचे भूमीपूजन?
17182 कोटींच्या 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. हे प्रकल्प वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर या ठिकाणी स्थित आहे.
 
यामुळे मुंबईची सांडपाणी प्रक्रिया क्षमता प्रतिदिन : 2464 दशलक्ष लिटर इतकी होईल आणि यामुळे 80% लोकसंख्येला लाभ होईल.
 
बृहन्मुंबई महापालिकेच्या 3 रुग्णालयांचे 1108 कोटी खर्चासह बांधकाम आणि पुनर्विकास होणार आहे. ही रुग्णालयं गोरेगाव, भांडुप, ओशिवरा या ठिकाणी स्थित आहेत. यामुळे २५ लाख गरजूंना लाभ मिळेल.
 
6079 कोटी खर्चांसह 400 रस्त्यांचे भूमिपूजन होणार आहे. यासोबतच रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल तसेच मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचं काम करण्यात येईल.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारत हरित प्रमाणित होणार आहे. यासाठी 1813 कोटी रूपयांचा खर्च येईल.
 
कोणत्या गोष्टींचे लोकार्पण?
मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व – डी एन नगर) 26,410 कोटी खर्चासह, 18.6 किमी मार्गिका आणि 17 स्थानकं.
 
मेट्रो मार्गिका 7 (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व ) 6208 कोटी खर्चासह 16.5 कि.मी. मार्गिका आणि 13 स्थानके असतील.
 
या मेट्रो मार्गांच्या कामाची सुरूवात 2015 साली झाली होती. या मेट्रो भारतात बनलेल्या आहेत.
 
बृहन्मुंबई मनपाच्या 20 नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण झालं.
 
इथे मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत 147 रक्त चाचण्या, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला गरजूंना मिळेल.
 
लाभ वितरण
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण करण्यात येईल. 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार आहे.
 
पंतप्रधान दौऱ्यामुळे वाहतूक बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत रेल्वे तसंच रस्ते मार्गात बदल करण्यात आलेले होते.
 
आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही काळासाठी बंद असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाब्याकडे) तसंच 5.30 ते- 5.45  या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल. 
 
मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
Published By -Smita Joshi