गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 मार्च 2021 (07:31 IST)

पुण्यापाठोपाठ आता मुंबईच्या हाफकिन मध्येही बनणार कोरोनाची लस

पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही कोरोना लशीची  निर्मिती होणार आहे. मुंबईतील हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन कोरोना लशीचं उत्पादन घेणार आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
 
कोविड लशीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केलं होतं. दरम्यान आता हाफकिनमध्ये लस तयार होणार आहे.
 
हाफकिनमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या लशीचं उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग आणि फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल.
 
सध्या या लशीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत असून हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे कोरोना लशीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.
 
हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लशीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरू ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करून या लशीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लशींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.
 
भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरवण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनामार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्लांटसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली आहे.