अमित शाहांचा नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी फोन
भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सध्या भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून फोन आणि भेटीगाठी घेऊन आश्वस्त केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते.
आम्ही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या विधानाशी सहमत नाही. मात्र, एक पक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठिशी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्याचीच री ओढली होती. याशिवाय, बुधवारी दिवसभरात भाजपच्या नेत्यांकडून नारायण राणे यांना समर्थन देणारी वक्तव्ये करण्यात आली होती. या सगळ्यातूनच भाजपने आपण नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.