रविवार, 5 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (14:25 IST)

जामा मशिदीत मुलींच्या एकट्याने प्रवेशावर निर्बंध

देशातील सर्वात मोठी मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीत आता एकट्या मुलींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जामा मशीद व्यवस्थापनाने यासंदर्भात आदेश जारी केला असून मशिदीच्या गेटवरच नोटीससारखी पट्टी लावण्यात आली आहे, ज्यामध्ये मुलींना जामा मशिदीत एकट्याला प्रवेश नाही, असे स्पष्टपणे लिहिले आहे. तिन्ही गेटवर ही नोटीस लावण्यात आली आहे.
 
सोशल मीडियावर या प्रकरणावरुन जामा मशीद व्यवस्थापनावरही टीका होत आहे. जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून दिल्ली महिला आयोगाने मशिदीच्या इमामाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाला यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी सांगतात की, मुली आपल्या बॉयफ्रेंडसोबत मशिदीत येतात अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे अशा मुलींना एकट्याने येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शाही इमाम म्हणाले की, जर एखाद्या महिलेला जामा मशिदीत यायचे असेल तर तिला तिच्या कुटुंबीयांसह किंवा पतीसोबत यावे लागेल. नमाज पठणासाठी येणाऱ्या महिलेला रोखले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
या निर्णयावर जामा मशिदीचे इमाम यांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापनाचे जनसंपर्क अधिकारी सबीउल्ला खान सांगतात की, अनेकवेळा मुले-मुली येथे रील शूट करतात, हास्यास्पद कृत्य करतात. अशा घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागला.