रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (15:09 IST)

दोन दिवस मृत आईजवळ होतं दीड वर्षाचं बाळ, पोलिसांनी भरवला मायेचा घास

-राहुल गायकवाड
''आम्ही जरी खाकी वर्दी घातली असली तरी त्या आत देखील माणूसच आहे. त्यावेळी त्या बाळाला आमची गरज होती. बघ्यांची गर्दी झाली होती पण कोणीच त्या बाळाला घ्यायला तयार नव्हतं. त्या बाळानं दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही आमचं बाळ समजून त्याला कुशीत घेतलं आणि खाऊ घातलं.''
 
पोलीस शिपाई असलेल्या रेखा वाजे आणि सुशिला गभाले सांगत होत्या.
 
पुण्यातील दिघी भागामध्ये एका घरात महिला मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी त्या घराच कोणीच नव्हतं. दीड वर्षाचा चिमुकला आपल्या आई जवळ निपचित पडला होता. घरातून कुजलेला वास येत असल्यानं नागरिकांनी पोलिसांना कळवलं.
 
26 एप्रिल रोजी ही घटना समोर आली. तब्बल दोन दिवस तो चिमुकला त्याच्या आईच्या जवळ निपचित पडला होता. रेखा आणि सुशिला घटनास्थळी पोहचताच त्यांनी त्या बाळाला जवळ करत त्याला खाऊ घातलं.
 
दिघी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरस्वती राजेश कुमार (वय 29 मूळ रा. कानपूर उत्तरप्रदेश) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
 
महिलेचा पती राजेश कुमार कामानिमित्त दीड महिन्यापूर्वी कानपूरला गेला होता. ती महिला आणि दीड वर्षाचं मुल दोघंच घरात राहत होते. घटनेच्या आदल्या दिवशी राजेश याने सरस्वतीला फोन केला होता. तेव्हा ती आजारी असल्याचं कळालं होतं.
 
त्यानंतर दोन दिवस सरस्वतीशी त्याचा संपर्क झाला नव्हता. घरातून दुर्गंधी येत असल्यानं नागरिकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यावेळी दीड वर्षाचा मुलगा त्या महिलेजवळ असल्याचं दिसून आलं.
 
घटनास्थळी रेखा आणि सुशीला गेल्या तेव्हा त्या बाळाच्या अंगावर कपडे देखील नव्हते. त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि कपडे घातले. त्यानंतर त्याला दूध आणि बिस्किट खाऊ घातलं.
 
"दोन दिवस काही खाल्लं नसल्यानं बाळ अशक्त झालं होतं. त्याला खाऊ घातल्यानंतर किती खाऊ असं त्या बाळाला झालं होतं," असं रेखा आणि सुशीला सांगतात.
 
सुशीला म्हणाल्या, ''आई जवळ पडलेलं बाळ पाहून मन पिळवटून गेलं. तेव्हा त्याला आमची गरज होती. आपलं स्वतःचं बाळ समजून आम्ही त्याला जवळ केलं. बघ्यांची मोठी गर्दी तिथे झाली होती. पण घाबरून त्या बाळाला घ्यायची कोणाची हिम्मत नव्हती. त्यामुळे आम्हीच त्याला जवळ केलं. आमच्यासाठी ते बाळ आमच्या स्वतःच्या बाळासारखंच होतं.''
 
''कोव्हिडमुळे त्या बाळाच्या जवळ कोणी जाण्यास तयार नव्हतं. पोलीस असलो तरी शेवटी आम्ही देखील माणूस आहोत. त्या बाळाला त्यावेळी आमची सर्वाधिक गरज होती त्यामुळे त्याला जवळ करणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. त्याची आई कशाने मृत्युमुखी पडली, त्याला कोरोना असेल का? आपल्याला कोव्हिड झाला तर? आपल्या घरी देखील बाळ आहे त्याचं काय होईल?, असे कुठलेच विचार मनात आले नाहीत. आपल्या बाळासारखं ते बाळ आहे त्याची आई या जगात नाही, आता आपणच त्याला सांभाळलं पाहिजे हा विचार करुन त्याला जवळ केलं,'' रेखा सांगत होत्या.
 
त्या बाळाला काहीसा ताप होता. त्यामुळे रेखा आणि सुशीला त्याला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. दोन दिवस काहीच न खाल्ल्यानं त्याला अशक्तपणा आला होता.
 
डॉक्टरांनी काही गोळ्या देऊन त्याला जेवण देण्यास सांगितलं. खबरदारी म्हणून त्या बाळाची कोव्हिड चाचणी देखील करण्यात आली. त्या चाचणीत त्याचा निपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला दिघी येथील शिशुगृहात दाखल करण्यात आलं.
 
महिलेचं पोस्टमॉर्टम केलं असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अद्याप महिलेच्या मृत्यूचं कारण समजू शकलं नाही.
 
आत्तापर्यंतच्या तपासात पोलिसांना कुठल्याही घातपाताची शक्यता वाटत नाही. महिलेच्या पतीला पोलिसांनी बोलावून घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.