1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (12:34 IST)

पुणे ड्रग्ज: मीठ, रांगोळी ते 'रेडी टू इट फूड'चे पुडे; पोलीस अंमलदाराला मिळालेल्या टीपमुळे कसं उद्धवस्त झालं रॅकेट?

एका पोलीस अंमलदाराला मिळालेल्या टीपवरुन ड्रग पेडलरला पकडण्यापासून सुरू झालेला तपास एक मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीला आणणारा ठरला आहे.
 
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या तपासात जवळपास 1800 किलो मेफेड्रॉन तर सापडलं आहेच शिवाय पुणे ते लंडन असं त्याचं कनेक्शनही उघडकीला आलं आहे.
 
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये काम करणाऱ्या पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना सोमवार पेठेत ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली.
 
या प्रकरणात तपास करताना एका इर्टिगा कारमधून येत असलेल्या सोमवार पेठेतलाच रहिवासी असणारा वैभव माने (वय 40 वर्ष) आणि पुण्याचाच अजय करोसिया (35 वर्ष) या दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांकडे 500 ग्रॅम एमडी ड्रग सापडले.
 
हे ड्रग कुठून आले याचा तपास करत असताना त्यांच्याकडून हैदर नूर शेख याच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. हैदर शेख याच्याकडे 2 कोटी 50 लाख रुपयांचे 1 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले.
 
हैदरकडे चौकशी करताना पोलिसांना विश्रांतवाडीमध्ये त्याने मेफेड्रॉनचा साठा केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जवळपास 105 कोटींचा 52 किलो 520 ग्रॅम मेफेड्राॅनचा साठा पोलिसांना सापडला.
यात प्रश्न होता तो इतका साठा येतो कोठून. याचदरम्यान पोलिसांना तपास करताना विश्रांतवाडीमधल्या या गोडाऊनमध्ये येणारे टेम्पो फुटेजमध्ये दिसते. त्यांचे क्रमांकही मिळाले.
 
या टेम्पोचालकांकडे पोलिसांनी तपास केला आणि त्यातून ते पोहोचले थेट हे मेफेड्रॉन बनवणाऱ्या कारखान्यापर्यंत.
 
हा कारखाना कुरकुंभमधल्या एमआयडीसीमध्ये सुरू होता. केमिकल एमआयडीसीचा झोन असणाऱ्या या परिसरात बहुतांश फार्म्यास्युटिकल कंपन्या आहेत. त्यातल्या 'अर्थ केम' नावाच्या कंपनीमध्ये एकीकडे त्यांचं केमिकल प्रोडक्शन सुरु होतं तर दुसरीकडे हे मेफेड्रॉन तयार केलं जात होतं.
 
पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांना 663 किलो मेफेड्रॉन मिळालं. याची किंमत 1327 कोटी होती. याप्रकरणात पोलिसांनी युवराज भुजबळ या केमिकल इंजिनियर आणि भिमाजी साबळे या कंपनी मालकाला अटक केली.
 
तयार झालेलं मेफेड्रॅान दिल्लीत पाठवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यातून पोलीस अधिकाऱ्यांनी थेट दिल्ली गाठली.
 
त्यांच्या छाप्यात दिल्लीतल्या कटोला मुबारक साऊथ एक्सटेंन्शनमधल्या जगराम मंदिराजवळून जवळपास 310 किलो मेफेड्रॉन पोलिसांना मिळालं, तर मस्जीद मोड 323 साऊथ एक्सटेंशन पार्ट टू या ठिकाणावरुन 651 किलो मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केलं. या मेफेड्रॅानची किंमत होती 1940 कोटी रुपये.
 
याच दरम्यान सांगलीमध्ये देखील हे मेफेड्रॉन पाठवलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सांगलीतल्या कुपवाडमध्ये टाकलेल्या छाप्यातून पोलिसांनी मेफेड्रॉन ताब्यात घेतले. इथून पोलिसांनी आयुब मकानदार याला अटक केली.
 
चार ठिकाणच्या कारवाईमधून जवळपास 1800 किलो मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केले आहे. याची किंमत आहे 3276 कोटींची.
 
मेफेड्रॉनचे छापे आणि साठे तर पोलिसांनी उद्धवस्त केले आहेतच. पण त्यातून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली ती म्हणजे हे मेफेड्रॉन भारताल्या वेगवेगळ्या भागांसह परदेशातही पाठवलं जात होतं.
 
हे रॅकेटही परदेशातूनच चालवलं जात होतं. हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड आहे संदीप धुनिया.
 
कोण आहे संदीप धुनिया?
मुळचा बिहारचा असणारा संदीप धुनिया हा सध्या ब्रिटिश नागरिक आहे. 2016 मध्ये त्याला ड्रग्जच्याच प्रकरणात डायरेक्टरेट अॅाफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने अटक केली होती. त्यानंतर तो येरवडा जेलमध्ये होता.
 
याच दरम्यान त्याने आपलं हे ड्रग्जचं नेटवर्क तयार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. सध्या तो परदेशात असून काठमांडूमधून कतारला पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
याविषयी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "एका व्हर्टिकलचा प्रमुख असणारा हा आरोपी बिहारचा असून तो ब्रिटिश नागरिक आहे. या कारवाईनंतर तो दुसऱ्या देशात पळून गेला आहे. पुण्यातल्या एका प्रकरणात मोठा साठा पकडला त्यात त्यांना अटक करुन येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
 
तिथले त्यांचे परदेशी नागरिकांसोबतचे धागेदोरे आम्ही शोधत आहोत. तसेच तेव्हा मेफेड्रॅान तयार करुन देणारे जे केमिकल एक्सपर्ट आरोपी आहेत त्यांनाही धुनियाबरोबरच अटक केलेली होती आणि ते तुरुंगात आहेत. त्यांचाही तपास केला जात आहे.”
 
कसं चालायचं हे रॅकेट?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज भुजबळ हा 'अर्थ केम'मध्येच कामाला होता आणि त्याच्याकडूनच मेफेड्रॉनचा फॅार्म्युला तयार करण्यात आला होता.
 
नक्की किती मेफेड्रॉन हवं आहे याची माहिती संदीप धुनियाकडून युवराज भुजबळ याला दिली जायची. भुजबळ हा धुनिया आणि साबळे यांच्यातला दुवा होता. तयार झालेले मेफेड्रॉन मिठाच्या पॅकेट्समध्ये घालून टेम्पोतून ठिकठिकाणी पाठवलं जायचं.
 
जवळपास 50 किलो मिठाच्या पॅक मध्ये किंवा रांगोळीच्या पुड्यात 4 किलो मेफेड्रॉनचे पॅकेट टाकले जायचे.
 
ठिकठिकाणी पोहोचलेल्या या मेफेड्रॉनची विक्री जशी झाली आहे तसं ते भारतातल्या पंजाब हरियाणा अशा विविध ठिकाणी पोहोचवलं जात होतं. पण त्याच बरोबरीने परदेशातही याची विक्री केली जात असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
 
परदेशात मेफेड्रॉन पाठवण्यासाठी कुरियर सिस्टिमचा वापर केला जात होता. जसं भारतात मिठाचे आणि रांगोळीचे पुडे वापरले जात होते, तसं परदेशात पाठवताना 'रेडी टू इट फुड' पॅकेट्समधून ड्रग्ज पाठवले जात होते. छोट्या छोट्या पॅकेट्सच्या माध्यमातून हे ड्रग्ज पाठवले जात होते.
 
वेगवेगळ्या देशांची नावे असणारे फूट पॅकेट्स यासाठी वापरले जात होते. यासाठीचे रेडी टू इट पॅकेजेस अॅानलाईन मागवले जात होते. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे फू़ड पॅकेट्स आत्तापर्यंत वापरलं गेल्याचं दिसत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
या प्रकरणात पोलिसांनी दिल्लीतून अटक केलेले दिवेश भुतिया आणि संदीप कुमार या दोघांची फूड कुरियर सर्व्हिस होती. या कुरियर सर्व्हिसमार्फत हे पॅकेट्स पोहोचवले जात होते.
 
याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “ या आरोपींनी एक सप्लाय चेन तयार केली होती. कुरियर सर्व्हिसचे नेटवर्कसुद्धा तयार होते. लंडनमध्ये कन्साईनमेंट कुरियरच्या माध्यमातून जात होती. गेली काही वर्ष हे सुरु होतं.
 
नेमकं कधीपासून ते केलं जात होतं आणि दिल्लीपासूनची नेमकी सप्लायचेन काय आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात होलसेल आणि रिटेल सप्लाय चेन होत्या. आतापर्यंत होलसेल चेन आम्ही उद्ध्वस्त केल्या. आता 20 टीम तयार करुन रिटेल चेन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या त्यांचा तपास सध्या सुरू आहे.”
 
मेफेड्रॉन किंवा 'म्याऊ म्याऊ' हे ड्रग म्हणजे केमिकलपासून तयार केलेली पांढऱ्या रंगाची पावडर असते. 2015 मध्ये एनडीपीएस अॅक्टनुसार त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
 
काही केमिकलच्या मिश्रणांमधून हे ड्रग तयार केलं जातं. तयार होत असताना व्हॅनिला किंवा ब्लिचसारखा वास येत असल्याने शक्यतो जिथे हा वास लक्षात येणार नाही, अशा ठिकाणी ते तयार केलं जातं. हे केमिकल धुनिया सप्लाय करत होता. हे केमिकल घेण्यासाठी परवाना लागतो. त्यामुळे ते केमिकल काय कारण दाखवून ते विकत घ्यायचे हे समजलेले नाही.
 
इतर ड्रग्जच्या तुलनेत स्वस्त असल्याने 'पार्टी ड्रग' म्हणून मेफेड्रॉन सध्या ओळखलं जात आहे. त्याचा व्हायग्रासारखाही उपयोग अनेक जण करतात.
 
याविषयी बोलताना निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे म्हणाले,“पूर्वी अफू, गांजा, हिरोईन हे ड्रग्ज सापडायचे. ते अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमार्गे पुरवले जात होते. मेक्सिकन किंवा कोलंबियन ड्रग्जच्या सप्लायमध्ये हे ड्रग्ज होते. पण त्या आणि मेफेड्रॉनच्या सप्लायमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. ते ड्रग्ज उगवावे लागायचे. त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य होत नव्हतं.
 
एमडी ड्रग्जच्याबाबत ती परिस्थिती नाही. एमडी ड्रग हे केमिकल कॉम्बिनेशनमधून तयार केलं जातं. त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य होतं. साहजिकच त्याची उपलब्धता वाढत आहे.”
 
या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये झालेली ही पहिली रेड नाही. एका कंपनीमध्ये अशा पद्धतीने हे ड्रग्ज तयार होऊन पुरवले जात होते, तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या ते कसं निदर्शनास आलं नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 
कुरकुंभमध्ये यापूर्वी देखील असे छापे टाकले गेले आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे म्हणाले, " पोलीस करत आहेत ते चांगली गोष्ट आहे. पण मुळात ही त्यांची जबाबदारी नाही. हा माल तयार होऊन बाहेर गेला. त्यानंतर पैशांचे व्यवहार झाले आणि त्यानंतर आता पोलिसांची कारवाई झाली. पण असे लायसन्स देणे आणि त्याची तपासणी करणे ही जबाबदारी एफडीएची आहे. कंपनीला लायसन्स दिले जाते तेव्हा तपासणी करणे, दिलेल्या प्रकारातच औषध तयार होते आहे का हे पाहणे आणि इतर काही उत्पादन होत नाही ना याचीही तपासणी करणे ही एफडीएच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
 
जरी फार्मास्युटिकल कंपनी नसेल तरीही पोलिसांसोबत पुन्हा एफडीएची जबाबदारी येतेच कारण आपल्या कार्यक्षेत्रात काय तयार होतंय याची वेळोवेळी पाहणी करण्याची जबाबदारी ही एफडीएच्या अधिकाऱ्यांचीच असते.”
 
Published By- Priya Dixit