सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (07:47 IST)

पुणे महापालिकेकडून ४२ भागांमध्ये सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित

पुण्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या ४२ भागांमध्ये पालिकेने सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र  घोषित केले आहे. पुणे पालिकेच्या १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यलयांच्या हद्दीत हे निर्बंध असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकही क्षेत्र नाही. उर्वरित १० क्षेत्रीय झोन कार्यालयांच्या हद्दीत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी पालिकेने अखेर शहरातील ४२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये निर्बंध जाहीर केले आहे. त्यामुळे दर १५ दिवसांनी या निर्बंधांवर फेरआढावा घेतला जाणार असून त्यामध्ये बदल केले जाणार आहेत. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतु फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. मुंबईत दररोज एक हजाराच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे.
 
पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. वानवडी, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, हडपसर, शिवाजीनगर, धनकवडी, वारजे, कर्वेनगर, कोंढवा, येवलेवाडी, भवानी पेठ या भागात सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रमध्ये बाहेरील नागरिकांना इतर सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 
 
सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार असून रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार आहे. या सोसायट्यांमधील कच-याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाणार आहे. बाधित नसलेल्यांना कामावर जाण्याची मुभा असणार आहे. ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे. त्यांच्यावर बंधने असणार नाहीत. त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.