शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

उडता पुणे! शिक्षणाचे माहेरघर बनतंय ड्रग्स हब ?

शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध पुणे झपाट्याने मादक पदार्थांचे घर होत चाललंय की काय? येथे ड्रग्जचे जाळ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आणि 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (Mephedrone Drug) जप्त केले.
 
दरम्यान पुण्यातून एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन तरुणी मद्यधुंद अवस्थेत दिसून येत आहे. पुण्याच्या संस्कृतीचे वाटोळे लावणारे हे कटू सत्य धक्कादायक आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुण्याच्या वेताळ टेकडीचा आहे. हा व्हिडिओ मुळशी पॅटर्नमधील अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई यांनी रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. अशात प्रश्न उद्भवतो की आपल्या शहरातून पुण्यात शिक्षणासाठी येणारी तरुण पीढी कोणत्या चुकीच्या दिशेने पाऊल टाकत आहे?
 
रमेश परदेशी यांनी व्हिडिओत सांगितले की या वेताळ टेकडीवर नशेत धुत या दोघी मुली पुण्यातील महाविद्यालयात लॉ प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. व्हिडिओत एक मुलगी बेशुद्ध दिसत आहे तर दुसरी नशेत काहीतरी बडबडत आहे. परदेशी यांनी सांगितले की मुली दारु आणि मादक पदार्थ घेऊन टेकडीवर आल्या आणि शुद्धीत नाहीये. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
खरं तर कोथरुड परिसरातील वेताळ टेकडी पुणेकरांसाठी व्यायामसाठीची जागा असून येथे सकाळ-संध्याकाळ लोकं येत असतात. मात्र दाट झाडी असलेल्या या परिसरात तरुणी नशा करत असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओत परदेशी यांनी सवाल केला आहे की येथील संस्कृतीवर प्रहार होत असताना पुणेकर गप्प का?
 
खुलेआम मादक पदार्थ उपलब्ध असणे, पब आणि डिस्को तर सोडा पानटपरीवर देखील ड्रग्ज सहज मिळत असल्याचे सांगितले जात असताना सामाजिक जबाबदारी समजून घेणारे लोकं डोळे मिटून का बसले आहेत?
 
लहान वयातील मुला-मुलींकडे इतके पैसे असून जीवघेणे पदार्थ सहज उपलब्ध असणे ही काळजीत टाकणारी बाब आहे, येणारी तरुण पीढी नशेत बरबाद होत असेल तर देशाचे भविष्य काय असेल याकडे पालकांनी आणि सर्व नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
 
शिक्षण आणि संस्कृतीसाठी आपली ओळख असणार्‍या पुणे सारख्या शहराची गती इतकी वाईट होत असणे चिंताजनक आहे कारण येथे देशभरातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लोक येतात. अशात तस्कर या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना टार्गेट करून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याचा आरोप होत असताना आता गप्प बसून कसे चालणार?