गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (09:45 IST)

अनलॉक ! महापालिकेचे कामकाज 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालणार

पिंपरी चिंचवड- कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय अंतर्गत महापालिका कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीवर मर्यादित कालावधीसाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्व कार्यालयांतील अधिकारी कर्मचा-यांची तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती 100 टक्के ठेवण्यास मान्यता दिली आहे.
 
या सूचना सर्व महापालिका अधिनस्त कार्यालयांना लागू राहतील. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
 
‘कोरोना’ विषाणूंचा प्रसार महानगरपालिका कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन आदेशानुसार मर्यादित कालावधीसाठी महानगरपालिका कार्यालयांतील कर्मचा-यांची उपस्थिती 50 टक्के करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
 
‘कोरोना’ विषाणू महामारीचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 4 जून 2021 चे आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 द्वारे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केलेली आहेत.
 
त्यानुसार कोविड 19 चा सरासरी संक्रमणाचा दर व ऑक्सिजन बेड ऑक्युपेन्सी विचारात घेवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत.
 
या बाबी विचारात घेवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांतील अधिकारी कर्मचा-यांची तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती 100 टक्के ठेवण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात यावी असे आदेशात नमुद केले आहे.