रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तसंच जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
चांगदेव याठिकाणाहून एका कार्यक्रमानंतर रोहिणी खडसे घरी येत होत्या. त्यावेळी सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
रोहिणी खडसे यांच्या गाडीची समोरची काच फोडण्यात आली. त्यामुळं रोहिणी खडसे या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावल्या आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचंही पाहायला मिळालं आहे. दरम्यान पोलिसांनी लगेचच रोहिणी खडसे यांच्या घरी जाऊन प्रकरणाची माहिती घेतली.