बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नगर , मंगळवार, 8 जून 2021 (11:29 IST)

अंत्यविधीस ५०, विवाहास १०० जणांच्या उपस्थितीचे बंधन

करोना संसर्गाचे प्रमाण व प्राणवायूच्या खाटांवरील रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे नगर जिल्ह्यतील सर्व व्यवहार खुले होणार आहेत. मात्र काही कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह समारंभात जास्तीत जास्त १०० लोकांची उपस्थिती, मॉल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने, अंत्यविधीस ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवांवरील वेळेचे कोणतेही बंधन टाकलेले नाही. ज्या जिल्ह्यंत करोना संसर्गाचे प्रमाण पाच टक्कय़ांपेक्षा कमी व प्राणवायूच्या एकूण खाटांवरील रुग्णसंख्या २५ टक्?क्?यांपेक्षा कमी आहे, तेथील दैनंदिन व्यवहारावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल, शनिवारी सायंकाळी नगरमध्ये केली. नगर जिल्ह्यतील करोना संसर्गाचे प्रमाण ४.३० टक्के व प्राणवायूच्या एकूण खाटांवरील रुग्णसंख्या २४.४८ टक्के असल्याने नगर जिल्ह्यतील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज, रविवारी जारी केले.
या आदेशानुसार, अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित दुकाने—आस्थापना नियमित वेळेत कार्यरत राहतील. मॉल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत राहतील. रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत. सरकारी व खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थितीत त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील. सर्व क्रीडाविषयक क्रियाकल्प चालू ठेवण्यास परवानगी असेल. सर्व प्रकारच्या चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. बंदिस्त सभागृहामधील विवाह समारंभात एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्तीं यापैकी जे कमी असेल तितक्या व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहील. तसेच खुल्या जागेतील लग्न समारंभास जास्तीत जास्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. अंत्यविधीस ५० व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील. स्थानिक स्वराज्य संस्था—सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा, निवडणुकांस निर्बंध असणार नाहीत. सर्व प्रकारची बांधकामे, कृषीविषयक क्रियाकल्प चालू राहतील. वस्तू व सेवांचे ई—कॉमर्स व्यवहार चालू राहतील. व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही र्निबधाविना चालू राहील. सर्व प्रकारची कार्गो वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त ३ व्यक्तींसह) चालू राहील. खासगी कार, टॅक्सी, बस दीर्घ पल्ल्याच्या रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस मुभा असेल. तथापि, निर्बंधस्तर ५ मधील क्षेत्रातून सूटणाऱ्या किंवा अशा क्षेत्रात थांबा असणाऱ्या वाहतुकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई—पास असणे बंधनकारक असेल. सर्व प्रकारची औद्योगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेत चालू राहतील.
करोना प्रतिबंधक नियमांचे बंधन कायम
या आदेशान्?वये सुरू होणाऱ्या सर्व व्यवहारांच्या ठिकाणी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल व याच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्ती प्राधिकारी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभाग, परिवहन विभाग आदींवर असेल. शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नियमांची अंमलबजावणी संबंधित विभाग प्रमुख करतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना संसर्गाचा आठ दिवसांनी आढावा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जिल्ह्य़ाच्या करोना संसर्गाचे प्रमाण व प्राणवायूच्या एकूण खाटांवरील रुग्णांचे प्रमाण याचा आढावा दर आठ दिवसांनी घेतला जाणार आहे. या प्रमाणामध्ये वाढ झालेली आढळल्यास सुधारित निर्बंध लागू केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मनपा व जि. प.च्या सभा प्रत्यक्ष होणार
नगर शहराच्या महापौर पदाची निवडणूक येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. यासाठी होणारी सभा ऑनलाइन आयोजित केली जाईल, असा अंदाज होता तसेच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि. १४ जूनला ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. जि. प. सभा ऑनलाइन घेण्यास सदस्यांचा तीव्र विरोध आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांवरील निर्बंध हटवण्यात आल्यामुळे महापालिका व जिल्हा परिषद या दोन्हीच्या सभा प्रत्यक्षात होणार आहेत.