सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:13 IST)

भोगवे समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
 
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किनाऱ्याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ ने एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.
 
पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे.