रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 1 जुलै 2022 (09:16 IST)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : शिवसेनेची गोची की सरशी?

30 जूनला महाराष्ट्रात ज्या वेगानं राजकीय घडामोडी घडल्या, तशा क्वचितच याआधी घडल्या असतील.
 
29 जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. आता देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आलं. कारण त्याला कारणही तसंच होतं.
 
तिकडे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि इकडे ट्विटरवर भाजपनं फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन'चा व्हीडिओ ट्वीट केला. पण घडलं भलतंच.
 
फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं जाहीर केलं आणि स्वतः सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच साडेसात वाजता शपथविधी होईल, हेही स्पष्ट केलं.
 
पण शपथविधीला अर्धा तास बाकी असतानाच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा टीव्हीवर अवतरले आणि त्यांनी फडणवींसाना उपमुख्यमंत्री होण्याचा पक्षाचा आदेश आहे, असं जारी केलं. ते त्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ट्वीटसुद्धा केलं. त्यांच्या ट्वीटला लगेच अमित शहांनी दुजोरा दिला.
 
पुढे साडेसातला राजभवनात एकाऐवजी दोघांचा शपथविधी झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यंत्री झाले आणि महाराष्ट्र अचंबित झाला.
 
जसं हे महाराष्ट्राला अचंबित करणारं आहे. तसंच ते शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना तोंडात बोटं घालायला लावणारं आहे.
 
कारण "शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे," असं एकनाथ शिंदे बंड करून गुवाहाटीला गेल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का आता? तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळीच उपस्थित केला होता.
 
आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. परिणामी एक प्रकारे त्यांची मागणीच पूर्ण झाली आहे. पण त्याच एकनाथ शिंदेंना ठाकरे-राऊतांनी गद्दार ठरवून टाकलंय, तेच शिंदे अजून शिवसेनेच्या नेतेपदी कायम आहेत. अशात शिवसेना एकनाथ शिंदे यांच समर्थन करणार की त्यांना विरोध?
 
त्याशिवाय ज्या देवेंद्र फडणवीसांना ते शत्रू मानतात, त्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकरे त्यांचे पंख छाटण्याचं काम केलंय.
 
'...तर 2019 ला युती तुटलीच नसती'
त्यामुळे एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्यामुळे आता शिवसेनेची गोची झाली आहे की फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे सरशी?
 
याबाबत बीबीसीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांच्याशी बातचित केली.
 
भाजपला जर हेच करायचं होतं, तर 2019 ला केलं असं तर युती तुटली असती का, असा सवाल यांनी उपस्थित केला आहे.
 
"भाजपच्या चाणक्यांना आता हे सुचलं. त्यांना हे आधी का सूचलं नाही? हे आधीच सूचलं असतं तर हे आज घडलं असतं का? यामागे शिवसेनेचं खच्चीकरण करणं हा एकमेव हेतू आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षं पूर्ण होतील त्या दिवशी मी राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे लिहून द्यायला तयार होते. तरीसुद्धा त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही," असं सावंत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारलं असता सांवत म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांनी पक्षादेश मानला. कालचा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झाला. पण उद्धव ठाकरेसुद्धा शिंदेंना हेच म्हणत होते ना. त्यांना मुख्यमंत्री करायला ते तयार होते ना. मग त्यांनी पक्षादेश का पाळला नाही?"
 
शिंदेंनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. आता शिवसेना त्यांचं समर्थन करणार का, असा सवाल विचारल्यावर सावंत म्हणाले, "बाळासाहेबांच्या मुलाला पायउतार करून ते मुख्यमंत्री झालेत. अशावेळी त्यांनी शपथ घेताना बाळासाहेबाचं नाव घेऊन शिंदेंनी उपकार केलेत का? ते बाळासाहेबांचं नाव घेऊन भ्रम निर्माण करत आहेत."
 
शिवसेनेची सरशी की गोची?
ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांना यामुळे शिवसेनेची सरशीपेक्षा गोचीच जास्त झाल्याचं वाटतं.
 
"यात कोणत्याही बाजूने शिवसेनेचे सरशी झालेली नाही. उलटपक्षी एकनाथ शिंदेंच्या रुपाने शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून भाजप आणि फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, ते स्वतः मुख्यमंत्री झाले. पण शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले नाही. ते भाजपने करून दाखवले असा संदेश यातून भाजपने दिलाय.
 
याशिवाय 2019 च्या सत्ता स्थापनेत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध करून उद्धव ठाकरे यांना बळेबळे मुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं होतं. त्या पवारांनाही एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकून भाजपने चपराक लगावली आहे असं म्हणता येईल."
 
पण फडणवीस यांच्याबाबत भाजपनं घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी काहीचा सुखद धक्का असेल, पण त्याचवेळी त्यांची नामुष्कीच जास्त असल्याचं सीएनएन न्यूज-18च्या मुंबई ब्युरो चिफ विनया देशपांडे यांना वाटतं.
 
त्या सांगतात, "आपल्या नाकाखाली सुरू असलेलं बंड माहिती असून शिवसेनेला ते थांबता आलं नाही. त्यामुळे ही त्यांच्यासाठी मोठी नामुष्कीच आहे. पण आता घडलेल्या घडामोडी पाहाता फडणवीसांबाबत त्यांच्या पक्षाने जे केलं हा एक प्रकारे शिवसेनेसाठी सुखद धक्कासुद्धा आहे."
 
"पण आता सामनात काय लिहायचं किंवा पत्रकार परिषदेत काय म्हणायचं, याबाबत त्यांना विचार शिवसेनेला करावा लागेल, कारण आता बाळासाहेबांचा एक शिवसैनिकच त्यांचं आणि हिंदुत्वाचं नाव घेऊन मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे त्यांना आता पुढचं नरेटिव्ह सेट करताना शिवसेनेची मोठी दमछाक होणार आहे. त्यांच्याकडे आता युक्तिवाद करायला दारुगोळा कमी आहे," असं विनया पुढे सांगतात.