गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:08 IST)

आधी पत्नीने केली आत्महत्या, पाठोपाठ पतीचीही विहिरीत उडी

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेर भैरव पोलीस स्टेशन ला पती-पत्नी आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील रेखा किरण दौंड या महिलेने शनिवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिचा भाया बाळासाहेब दौंड यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
 
याबाबतची माहिती मुजफ्फर रमान पटेल यांनी पोलीस स्टेशनला दिली. ही घटना घडत नाही तोच मयत रेखा दौंडचे पती किरण चिंधु दौंड याने रविवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत पाण्यात उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
 
दरम्यान घटनेची माहिती पूरीचे पोलीस पाटील चंदू भाऊ आव्हाड यांनी वडनेर भैरव पोलीस स्टेशनला दिली. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत दोघांच्या मृत्यू बाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विजय घुमरे हे तपास करत आहेत.