शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:52 IST)

बेस्ट कर्मचारी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करा

मुंबईत बेस्ट उपक्रमात कोरोनाची पर्वा न करता आपले प्राण धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, बसवाहक आणि परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी यांच्यासाठी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी बेस्टचे हंगामी महाव्यवस्थापक आणि पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
 
२४ एप्रिल रोजी आपण स्वतः बेस्ट उपक्रमाच्या वडाळा, प्रतीक्षानगर, आणिक आणि वांद्रे आगाराला भेट दिली होती. मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या अक्षम्य गलथानपणामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी केला आहे. तसेच, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळेच आपण स्वतः कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची मागील २ वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे आणि त्या ठिकाणचे फॅन, कुलर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचे आशिष चेंबूरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहात १०००  पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश आशिष चेंबूरकर यांनी या पत्रातून दिले आहेत.