नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम
नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या आठवड्याप्रमाणेच उद्या रविवारी नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढते आहे. सोबत बाधितांचे आकडेदेखील वाढत आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी संयम पाळावा, रविवारी घरीच राहावे, असे कडकडीचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. मॉलपासून तर किराणा दुकानापर्यंत सर्व प्रतिष्ठाने उद्या बंद राहतील. उद्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार तसेच दारूची दुकाने बंद राहणार आहे. तथापी मांस, अंडी, मासे विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे. दारू विक्री संदर्भात दुकाने बंद असली तरी घरपोच सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीमध्ये पुढील एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत तूर्तास बंद असतील. यासंदर्भातील पुढील आदेश पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील.
सर्व लॉन्स, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचे कुठेही आयोजन करु नये. कार्यक्रम आयोजन करण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.