1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (08:10 IST)

रेखा जरे हत्याकांड : बोठेने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला दाखल

पूर्ण राज्याला हादरवून टाकलेले नगर जिल्ह्यातील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
 
मागील वर्षी जातेगाव (ता. पारनेर) घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.
अनेक दिवसांपासून बोठे अटकेत असून मध्यंतरी त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र, जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने बोठेच्यावतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला आहे.
 
या अर्जावर 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी होणार आहे.यावेळी युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाच्यावतीने वकील ज्ञानेश्‍वर काळे बाजू मांडणार असून बोठेच्यावतीने अ‍ॅड. मुकेश मोदी हे बाजू मांडणार आहेत.