शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (16:35 IST)

लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंदावण्याची शक्यता

देशात लसींच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. लसींचा पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत लसींच्या तुटवड्याची माहिती दिली.
 
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
 
त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिनचे जे डोस आहेत ते ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिली. केवळ कोव्हॅक्सिनचे डोस केंद्राकडून यायचे बाकी नसून कोव्हिशिल्डचे देखील १६ लाख डोस केंद्राकडून यायचे आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्षन यांच्याशी फोनवर १५ ते २० मिनिटं चर्चा केल्याचं टोपेंनी सांगितलं.