कपडे धुताना मुलगी तलावात बुडाली, तिला वाचविणाच्या प्रयत्नात इतर चौघी बुडाल्या
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात किनगाव च्या तुळशीराम तांडा येथे तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसह इतर चौघी जणी बुडाल्या अशा एकूण पाच जणी बुडाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी घडली आहे.या सर्व जणी परभणीच्या होत्या. राधाबाई धोंडिबा आडे(45), दीक्षा धोंडिबा आडे(20),काजल धोंडिबा आडे(19),सुषमा संजय राठोड (21), आणि अरुणा गंगाधर राठोड(25) असे या मृत्युमुखी झालेल्या महिलांची नावे आहेत. या सर्व जणी उसतोडणीच्या कामासाठी परभणीतून अहमदपूर तालुक्यात आल्या होत्या. शनिवारी आणि रविवार साखर कारखाना बंद असल्यामुळे त्या पाची जणी शनिवारी सकाळी तुळशीराम तांडाच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या. कपडे धुवत असताना अचानक त्यापैकी एक मुलगी बुडत आल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी एकापाठोपाठ एक तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोहता येत नसल्याने त्या पाची जणी पाण्यात बुडाल्या. त्यांना पाण्यात बुडताना पाहून त्यांच्या नात्यातील एका मुलीने लगेच आरडाओरडा करायला सुरु केले. तिच्या ओरडण्याला प्रतिसाद देत गावकरी तलावाच्या दिशेने त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.