प्राथमिक फेरीच्या शेवटच्या सामन्यासाठी भारत आणि श्रीलंकेच्या टीम इंग्लंडच्या लीड्स शहरात पोहोचल्या आहेत. हेंडिग्ले क्रिकेट ग्राऊंड आहे. इथंच हा सामना होणार आहे.
1992 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यॉर्कशायर क्रिकेट क्लबतर्फे काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी आला होता.
इथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना सचिनचा खेळ अजूनही आठवतो.
76 वर्षांचे शैलेंद्र सिंग नोटे त्यापैकीच एक. शैलेंद्र मागच्या चाळीस वर्षांपासून इथंच राहतात. टीम इंडिया सरावासाठी येईल याची वाट ते शुक्रवारी पाहत होते.
शैलेंद्र म्हणाले, "हे तर सचिनचं यॉर्कशायर आहे. भारतीय वंशाची आजची पीढी त्याला खेळताना पाहू शकत नाही, याचा खेद वाटतो. सचिन काउंटीमध्ये खेळायचा, त्यावेळी त्याने मारलेल्या फटक्यांचा आवाज मैदानाच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होता.
क्रिकेट नाही तर रग्बी लोकप्रिय
हेडिंग्ले स्टेडियम म्हणजे एक मोठं मैदान आहे. त्याच्या चारही बाजूंना रहिवासी भाग आहे. सध्याच्या दिवसांत या मैदानाला क्रिकेटपेक्षाही रग्बी खेळासाठी जास्त ओळखलं जात आहे.
उत्तर इंग्लंडमध्ये रग्बी खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. लीड्सची रग्बी टीम देशातील टॉपची रग्बी टीम म्हणून ओळखली जाते.
त्यामुळेच की काय, हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमच्या आत पोहोचताच एका दुकानासमोर लागलेला नोटीस बोर्ड तुमचं लक्ष वेधून घेतो. "क्रिकेटचा कोणताच स्टॉक उपलब्ध नाही. फक्त रग्बीशी संबंधित वस्तू, कपडे, जॅकेट वगैरे उपलब्ध आहेत." असं यामध्ये लिहिलेलं आहे.
स्टेडियमच्या दुसऱ्या भागात लीड्स रग्बीची तिकीट खिडकी आहे. त्याच्या बाजूलाही एक बोर्ड लावण्यात आला आहे. "क्रिकेट वर्ल्ड कपमुळे सध्या इथे तिकीट मिळू शकत नाही. असुविधेसाठी खेद आहे."
स्टेडियमचे एक सुरक्षारक्षक मार्क हॅन्सलो सांगतात, "मला तर आजपर्यंत क्रिकेट हा खेळच कधी कळला नाही. या ठिकाणच्या नव्या पीढीला क्रिकेटपेक्षाही जास्त रग्बी खेळामध्ये रस आहे."
ओसाड घरं
लीड्सवरून हेडिंग्लेत दाखल होण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागतात.
उच्चप्रतीच्या लाल रंगाच्या विटांनी बनलेली घरं आणि चर्च तुम्हाला संपूर्ण हेडिंग्लेमध्ये दिसतील.
इथलं क्रिकेट स्टेडियमसुद्धा या घरांच्या मधोमध आहे.
पण इथे ओसाड पडलेल्या घरांवर भाड्याने देणे आहे असा बोर्ड तुम्हाला दिसू शकतो.
स्टेडियमपासून काही अंतरावर अग्ली मग्स नावाच्या एका कॉफी शॉपमध्ये याबाबत स्थानिकांना विचारलं. सध्या इथं रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदी असल्याचं त्यांच्याकडून कळलं.
"जुने लोकं आपली घरं सोडून एकांतात राहण्यासाठी जात आहेत. कारण इथं मोठ्या आणि गगनचुंबी इमारती बनवण्याची पद्धत येत आहे. बहुतांश लोकांना हे आवडत नाही." असं एका स्थानिकानं सांगितलं.
त्यावेळी अचानक भारताची आठवण आली. भारतात सुद्धा मागच्या चार वर्षांत रिअल इस्टेट मार्केटमध्ये उतार आल्याचं दिसत आहे.
दिल्ली-एनसीआर किंवा मुंबईसारख्या महानगरांमध्ये जागांच्या किमती वाढण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
पण इंग्लंडमध्ये आणि विशेषतः उत्तर भागात परिस्थिती आणखीनच वाईट आहे. 2012 पासून लीड्सच्या प्रॉपर्टी बाजाराने फक्त मागच्या वर्षी उसळी घेतली होती आणि तीसुद्धा केवळ 0.3 टक्क्यांची!