गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (08:40 IST)

दत्त जयंती : कोल्हापुरात इंग्रज अधिकाऱ्याचा पुतळा फोडून तयार केलेली दत्ताची मूर्ती

स्वाती पाटील
दत्त जयंतीनिमित्त आज सगळीकडे दत्त मूर्तीची पूजा केली जाते. कोल्हापूरमध्ये अशा एका दत्त मूर्तीची पूजा केली जाते जी साकारली आहे एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून..ही रंजक गोष्ट नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा भारतावर इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा 1929 साली कोल्हापूरमध्ये सर लेस्ली विल्सन यांचा पुतळा उभारला गेला. मध्यवर्ती वस्तीत शुभ्र संगमरवरी दगडात घडवलेला 15 फूट उंचीचा हा पुतळा होता. भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी स्वतः या पुतळ्याचे उद्घाटन केले होते.
 
स्वातंत्र्य लढ्यात देशभरात चले जाव आंदोलनाचा आवाज घुमत होता. पश्चिम महाराष्ट्रात नागनाथआण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वात पत्री सरकार इंग्रजांना आव्हान देत होतं. कोल्हापूरमध्ये गल्ल्यांमध्ये क्रांतीकारक घडत होते. अशात मध्यवस्तीत असणारा हा पुतळा प्रत्येकाच्या मनाला वेदना देत होता. पुतळा हटवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात होती.
पण ब्रिटिश राजवटीत हे सहज होणं शक्य नव्हतं. अशा वेळी पहिल्यांदा दोन महिला स्वातंत्र्यसेनानींनी हे धाडस केले. भागीरथी तांबट आणि जयाबाई हविरे यांनी या पुतळ्यावर अॅसिडयुक्त डांबर टाकत पुतळा विद्रुप करण्याची योजना आखली. घटस्थापनेच्या दिवशी 10 ऑक्टोबर 1942 रोजी डांबराने भरलेली १४ मडकी या दोघींनी भर दुपारी 12 वाजता विल्सन यांच्या पुतळ्यावर ओतली. त्यामुळं शुभ्र संगमरवरी पुतळा विद्रुप झाला.
 
अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी भागीरथी तांबट आणि जयाबाई हविरे यांना अटक केली. या दोघींना 16 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
इकडे डांबरामुळे विद्रुप झालेला पुतळा पुन्हा स्वच्छ करण्यात आला. सोबतच पुतळ्याजवळ कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला. या लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांनी महिलांना झालेल्या शिक्षेमुळे आता कोणत्याही परिस्थितीत पुतळा हटवण्याचे अर्धवट काम पूर्ण करण्याची योजना आखायला घेतली.
 
शंकराव माने यांच्या नेतृत्वात शामराव पाटील, दत्तोबा तांबट , अहमद मुल्ला, डॉ,माधवराव कुलकर्णी, निवृत्ती आडूरकर, सिदलिंग हाविरे, काका देसाई, पांडुरंग पोवार,व्यकटेश देशपांडे, नारायणराव घोरपडे,पैलवान माधवराव घाटगे, नारायणराव जगताप, कुंडलिक देसाई या स्वातंत्र्यसैनिकांचा हा पुतळा फोडण्याच्या कामगिरीत सहभाग होता.
 
त्यानुसार पुतळा स्वच्छ करण्याचा बहाणा केला गेला. यासाठी 20 जणांच्या पथकाने पुतळा फोडण्यापासून ते पोलिसांना चकवा देऊन निसटण्याची योजना आखली. गुप्त बैठक घेत अखेर 13 सप्टेंबर 1943 रोजी पहाटे साडेचार ते पाच दरम्यान या स्वातंत्र्यसैनिकांनी या पुतळ्यावर घणाघाती घाव घातले.
 
पुतळा स्वच्छ करण्यासाठी आणलेल्या बादलीत पिस्तुल, खराटा, मोठा हातोडा आणण्यात आला होता. शामराव पाटील यांनी पुतळ्याच्या चेहऱ्यावर हातोड्याने घाव घालत कान,नाक तोडले. काका देसाईनी आरडाओरडा करणाऱ्या लोकांवर पिस्तुल रोखून धरली. काम फत्ते झाल्यावर पोलीस वेषात असलेल्या सहकाऱ्यांनी पुतळा फोडणाऱ्या लोकांना पळत जाऊन पकडण्याचा बहाणा केला. आणि हे सगळे पसार झाले.
अशा रितीने विल्सन पुतळा फोडण्याची कामगिरी पार पडली. कोल्हापूरच्या इतिहासात या घटनेचा विल्सन नोज कट म्हणून उल्लेख आहे. काही दिवस झाकून ठेवत 1944 साली विद्रुप अवस्थेतील हा पुतळा हटवण्यात आला.
 
1945 साली भालजी पेंढारकर यांच्या पुढाकाराने याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोल्हापूरमधील भंगार वस्तुंचे व्यापारी मेहता यांनी विल्सन यांचा हा पुतळा खरेदी केला. भंगारात पडून असलेल्या पुतळ्याचे अवशेष आजही कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात.
 
1950 ते 60 च्या दरम्यान सध्याच्या फुलेवाडी परिसरात रंकाळा आडवा पाट कुरण इथं गवताचे कुरण होते. अनेकांची जनावरं गवत चरण्यासाठी इथं यायची. त्यासाठी कोल्हापूर दरबारला पट्टी भरली जायची. शहाजी छत्रपती महाराजांनी ही पट्टी माफ केली. त्यामुळं उरलेल्या पैशातून इथं मंदिर उभारण्याची योजना ठरवण्यात आली. त्यासाठी श्रीपतराव बोंद्रे यांनी पुढाकार घेतला.
बोंद्रे यांनी संगमरवरी दगडासाठी मेहता यांच्याकडून विल्सन यांच्या पुतळ्याचा धडाचा तीन फुटांचा भाग विकत घेतला. राजस्थानहून कारागीर बोलावून सुबक अशी दत्त मूर्ती साकारण्यात आली. 1964 साली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कऱण्यात आली.
 
कोल्हापूरचे अभ्यासक भारत म्हारुगडे यांनी याबाबत अभ्यासपूर्ण माहिती संकलन केली आहे. त्यातून विस्मृतीत गेलेली पुतळ्याची ही रंजक गोष्ट समोर आली.
 
दर गुरुवारी आणि दत्त जयंतीच्या सोहळ्यासाठी अनेक भाविक श्रद्धेने या दत्त मूर्तीसमोर नतमस्तक होतात. पण ही मूर्ती ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून घडवली गेली याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही.