बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (20:10 IST)

ड्रोन होत आहेत आधुनिक युद्धांचं हत्यार

जोनाथन मार्कस
युद्धासाठी वापरले जाणारे ड्रोन हे एकेकाळी महाशक्तींकडेच असायचे, पण आता ते बंडखोर, लहान देश यांच्याकडेही उपलब्ध असून त्यामुळं देशांच्या युद्धाच्या पद्धतीही बदलत आहेत.
 
लष्करी इतिहासात नेहमी पाहायला मिळालं आहे की, एखादं शस्त्र हे संपूर्ण युद्धाचं प्रतीाक बनतं.
 
तुम्ही मध्यकालीन युगात इंग्रज धनुर्धरांकडून वापरल्या जाणाऱ्या लांब धनुष्याबाबत विचार करू शकतो किंवा दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाचे असलेले कवच असलेले रणगाड्यांचाही विचार करता येईल.
 
मानवविरहीत एमक्यू-1 प्रिडेटर किंवा यूएव्हीलाही अमेरिकेच्या अफगाणिस्तान, इराक किंवा इतर ठिकाणांवर सुरू झालेल्या दहशतवादविरोधी युद्धात प्रतिष्ठा मिळाली होती.
 
शीत युद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका हा एकटा देश समोर कोणत्याही प्रकारचं मोठं आव्हान नसताना एका महाशक्तीच्या रुपात उभा होता. अमेरिकेसाठी हा 'युनिपोलर मोमेंट' होता.
 
प्रिटेडरला टेहाळणी विमान म्हणून वापरण्याचा विचार झाला आणि त्यात हेल्फायर क्षेपणास्त्रानं सज्ज करण्यात आलं त्यावेळी या ड्रोनला अधिक प्रतिष्ठा मिळाली.
 
त्यानंतर येणाऱ्या रीपरला विशेषतः हंटर किलरच्या रुपात विकसित करण्यात आलं होतं. त्यापूर्वी आलेल्या कोणत्याही ड्रोनच्या तुलनेत त्याची रेंज ही खूप जास्त आहे. तसंच हे अधिक वजनाच्या युद्ध साहित्याच्या वाहतुकीतही सक्षम आहे.
 
याच्या सहाय्यानं अमेरिका त्यांच्या शत्रूंना पाहिजे तेव्हा आणि पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष्य करू शकतात. अगदी त्यांचे शत्रू कल्पनाही करू शकणार नाही, अशा ठिकाणीही ते हल्ला करू शकतात.
जानेवारी 2020 मध्ये बगदाद एअरपोर्टच्या बाहेर इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांना लक्ष्य करणारे हेच रिपर ड्रोन होते, असं सांगितलं जात आहे.
 
पण अगदी कमी काळासाठी (केवळ) अमेरिका किंवा इस्रायल ( त्यांच्या ड्रोन इंडस्ट्रीच्या जोरावर) या टेक्नॉलॉजी वर राज्य करू शकतात. हे युद्ध ड्रोनचं पहिलं युग असल्याचं म्हटलं जाऊ शकतं.
 
तेव्हापासून आतापर्यंत अत्यंत वेगानं परिस्थितीत बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
युद्ध ड्रोन क्षेत्रात अनेक नवीन प्लेयर (देश) आल्यामुळं एका नव्या युगात प्रवेश केला आहे. यूएव्हीचा वापर दहशतवाद, दहशतवाद विरोधी युद्धाच्या पुढं जात आता पूर्णपणे पारंपरिक युद्धात बदलला गेला आहे. वास्तविक पाहता ड्रोन तिसऱ्या युगाच्या उंबरठ्यावर आहेत, याठिकाणी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी त्याचा संबंध आहे.
 
हंटर किलर- एमक्यू-9 रीपर
- यासमोर नोझवर कॅमेरा आणि खालीही सेंसरसह कॅमेरा आहे.
 
- अधिक स्थिरतेसाठी व्ही आकाराची शेपटी
 
- हे जीपीएस किंला लेझर गाइजेज क्षेपणास्त्र आणि ये बॉम्बने सुसज्ज आहेत
 
- लांबी : 10.97 मीटर (36 फूट)
 
- उंची : 3.66 मीटर (12 फूट)
 
- पंखांचा विस्तार : 21.12 मीटर (69 फूट 3½ इंच)
 
- कमाल वेग - : ताशी 463 किलोमीटर (ताशी 287 मैल)
 
नकत्याच झालेल्या संघर्षामध्ये टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (टीपीएलएफ) च्या बंडखोरांच्या हल्ल्याचा सामना करत इथियोपिया सरकारसाठी या ड्रोननं महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
इथियोपिया सरकारनं तुर्कस्तान आणि इराणकडून सशस्त्र ड्रोन खरेदी केले आहेत. संयुक्त अरब अमिरात (युएई) द्वारे चीनच्या विंग लूंग-2 पर्यंतही त्यांची पोहोच असल्याचं सांगितलं जात आहे. युएईनं याच पद्धतीनं लीबियाच्या गृहयुद्धात त्यांचे सहकारी जनरल खलीफा हफ्तार यांनाही चीनमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा पुरवठा केला होता.
 
महत्त्वाची भूमिका निभावणारे ड्रोन
 
फेब्रुवारी 2020 मध्ये सिरियामध्ये स्प्रिंग शिल्ड या मोहिमेदरम्यान आणि लीबियात खलिफा हफ्तार यांच्या बंडखोर लष्कराच्या विरोधात यापूर्वीही तुर्कस्ताननं या ड्रोनचा वापर केला आहे.
 
सशस्त्र ड्रोन चा परिणाम हा निर्णायक असल्यानं अनेकदा पाहायला मिळालं आहे. लीबियामध्ये अधिकृत सरकार कायम राहण्यात त्याचं योगदान राहिलेलं आहे. तसंच गेल्यावर्षी त्यांनी नार्गोनो-कराबाख युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
तुर्कस्तानकडून मिळालेल्या ड्रोनमुळंच अझरबैजानचं लष्कर हे आर्मिनियाच्या वादग्रस्त भागावर ताबा मिळवण्यात यशस्वी ठरलं होतं.
 
ड्रोन हल्ले नेहमी कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या द्विधा परिस्थिती निर्माण करतात. त्यांची मारक क्षमता ते चालवणाऱ्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते. शस्त्रास्त्र मर्यादीत ठेवणं आणि करारांद्वारे त्यांच्या वापरावर बंदी आणण्याची शक्यता अद्याप सत्यात उतरलेली नाही.
 
अमेरिका त्यांचं तंत्रज्ञान अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांशिवाय कोणत्याही देशाला देण्यास इच्छुक नाही. इतर देश मात्र अशाप्रकारचा भेदभाव करत नाही.
 
पण युएव्ही ज्या वेगानं पुढं सरकत आहे त्यानुसार त्याला रोखणं कठीण वाटत आहे यात शंका नाही.
 
100 पेक्षा अधिक देश आणि देश नसलेल्या समुहांकडे ड्रोन उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेकांकडे सशस्त्र ड्रोन आहेत.
 
सेंटर फॉर न्यू अमेरिका सिक्युरिटीमध्ये संचालक असलेले पॉल शरेर यांनी ड्रोनच्या संख्येत वाढ होणं आणि त्याचा विकास सुरुच राहील, असं वाटत असल्याचं म्हटलं.
 
"चीन जगभरात सशस्त्र ड्रोनचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. इराण, तुर्कस्तानसारख्या देशांकडे ड्रोनचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि ते विदेशांत ही शक्ती विकत आहेत," असं ते म्हणतात.
 
"व्यावसायिक ड्रोन टेक्नोलॉजी एवढ्या सहजपणे उपलब्ध आहे की, कोणीही काही शेकडो डॉलर मोजून क्रूड डीआयवाय हल्लेखोर ड्रोन तयार करू शकतात. काही दहशतवादी संघटनांकडेही ते आहेत," असंही त्यांचं म्हणणं आहे.
युएव्हीचा परिणाम निर्णायक असण्यात आश्चर्याची बाब नसल्याचं ते सांगतात. ते एखाद्या देशाला अत्यंत स्वस्तात हवाई दल उपलब्ध करून देत आहेत.
 
ड्रोन किती प्रभावी
एखादा देश किंवा समूह जे लढाऊ जेट खरेदी करण्याचा धोका पत्करू शकत नाहीत, ते ड्रोन खरेदी करू शकतात.
 
"हे ड्रोन फाइटर जेटसारखं युद्ध करण्यात सक्षम नसले तरी, काही प्रमाणात हवाई हल्लायात निर्णायक आघाडी नक्कीच मिळवून देऊ शकतात. डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीनं टेहाळणी आणि सटिक हल्ल्याची क्षमता असलेले ड्रोन लष्करी सैन्यासाठी घातक ठरू शकतात," असं ते म्हणाले.
 
मात्र, गृहयुद्धांमध्ये किंवा प्रादेशिक संघर्षांमध्ये युएव्हीचा वापर भविष्यातील युद्धात ड्रोनच्या महत्त्वाच्या भूमिकेची केवळ एक झलक आहे.
 
जेव्हा अमेरिका आणि त्यांचे सहकारी देश दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये व्यस्त होते तेव्हा रशिया सिरियाच याचा वापर करत होता. मोठ्या युद्धात याचा वापर कसा करायचा याचा विचार करत रशिया सिरियात याची चाचणी करत होता.
 
"सीरियामध्ये रशियाच्या ड्रोन पथकांनी महत्त्वाची, गोपनीय, निगराणी, टेहेळणी मोहमा पार पाडल्या. ड्रोनच्या सर्वेक्षणांच्या आधारे रशियाची शस्त्रास्त्रं, रॉकेट लाँच सिस्टीम आणि विमानांद्वारे रियल टाइम लक्ष्यांवर मारा करण्यात आला," असं सेंटर फॉर नेव्हल अॅनालिसिसमधील रशिया स्टडीज प्रोग्रामचे सदस्य सॅमुएल बेंडेट म्हणाले.
 
"रशियाचं लष्कर आजच्या तारखेत आणि भविष्यात युद्धाच्या मैदानात यूएव्हीची मदत आणि सर्वेक्षण केलेल्या युद्ध क्षेत्रांच्या फोटोंच्या माध्यमातून कशाप्रकारे लढणार, हे यामुळं पुन्हा एकदा हे स्पष्ट होत आहे. यापूर्वीच्या जनरलकडे नव्हतं असं काही तरी हे आहे."
 
रशिया आणि ड्रोन
यूक्रेनबरोबरच्या लढाईत रशियाचा यूएव्हीचा वापर योजनाबद्ध पद्धतीनं करत आहे. पूर्व यूक्रेनमध्ये रशियामध्ये तयार झालेले अनेक ड्रोन पाडण्यात आले आहेत.
 
गोपनीय माहिती मिळवणे आणि टेहाळणी करणं हे ड्रोनचं मुख्य मिशन आहे. विशेष पद्धतीचे रशियन ड्रोन त्यासाठी अगदी योग्य ठरतात, असंही बेंडेंट म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक युद्ध ही अशी कला आहे, ज्याद्वारे शत्रूच्या शक्तीचा अंदाज हा त्यांनी पाठवलेल्या माहितीमध्ये प्रवेश करून त्यामाध्यमातून लावण्यात येतो.
 
रशिया प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा एक दशक मागं असू शकतं, पण रशियाचं लष्कर त्यांच्या लढाऊ ताफ्यात ड्रोनचा समावेश करण्यात त्यांच्यापेक्षा खूप पुढं असू शकतं.
 
"मिलिट्री ड्रोन संपूर्ण रशियन सैन्य दलाकडे उपलब्ध आहेत आणि त्याची उपयोगिता युक्रेनमधील माहिती मिळवली तेव्हाच पाहायला मिळाली आहे. त्यांचा संपर्क रोखण्यात आला आणि तोफा त्यांच्याकडे वळण्यात आल्या होत्या," असं बेंडेट म्हणाले.
 
ड्रोनचा सामना कठीण का आहे?
 
वास्तवतः युक्रेनकडेही तुर्कस्तानचे ड्रोन आहेत. त्यांनी याचा वापर डोनबालचे रशियन समर्थक असलेल्या फुटीरतावाद्यांवरही केला होता.
 
अधिक तीव्रता असलेल्या युद्धाच्या मैदानाच्या पलिकडं ड्रोन आजही बंडखोर आणि मिलिशिया युनिट वापर करत आहेत.
 
पण ड्रोनच्या धोक्याचा योग्यप्रकारे विचार केला तरी त्याचा सामना करणं एवढं सोपं ठरणार नाही.
 
"आज वापर केले जाणारे बहुतांश ड्रोन पारंपरिक विमानांपेक्षा खूप लहान असतात. तसंच त्यांना वेगळ्या पद्धतीचं हवाई संरक्षणही हवं असतं. ते अत्यंत कमी वेगानं आणि कमी उंचीवर उडत असतात. त्याचा अर्थ म्हणजे अनेक एअर डिफेन्स सिस्टीममध्ये त्यांना पाडण्याची यंत्रणा उपलब्ध नसते," असं पॉल शरेर म्हणतात.
 
"अनेक देश सध्या ड्रोन हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं याचा अभ्यास आणि तयारी करत आहेत. आगामी काळात आपल्याला युद्धाच्या मैदानात ड्रोन रोखण्याच्या अनेक प्रभावी पद्धती पाहायला मिळतील," असं ते म्हणाले.
 
मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला झाल्यास तो रोखणं हे आव्हान असेल, कारण कमी खर्च असलेले ड्रोन मोठ्या संख्येनं तयार केले जाऊ शकतात. त्यामुळं भविष्यातील 'ड्रोन स्वार्म्स' बाबत अनेक चर्चा होत असतात.
 
"आम्ही मोठ्या संख्येनं झालेला ड्रोन हल्ला पाहिला आहे. 2018 मध्ये सिरियातील बंडखोरांनी 13 ड्रोनच्या मदतीनं रशियाच्या एअर बेसवर हल्ला केला होता," असं पॉल शरेर म्हणाले.
 
मात्र, ड्रोन वाढणं हे स्वार्म्स (मधमाश्यांसारखे ) सारखं नाही, असं पॉल शरेर जोर देत म्हणाले.
 
स्वार्म्सबाबत ते म्हणाले की, असे हल्ले ड्रोनच्या संख्येवरून नव्हे तर, आपसांत सगयोग करण्याची त्यांची क्षमता आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चालवण्यावरून त्याचा प्रभाव ठरतो.
 
ड्रोन स्वार्म्सचा वापर वेगळ्या पद्धतीनं आणि सातत्यानं हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
सर्वात शेवटी त्यांनी युद्धाती दशा आणि दिशा बदलण्यात याचा (ड्रोनच्या वापराचा ) नाट्यमय प्रभाव असू शकतो, असा इशाराही दिला.