शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

तुम्ही चांगले पिता आहात की नाही हे कसं ओळखाल?

- सोफी हार्डच
बाळाच्या उत्तम संगोपनासाठी आई आणि वडील दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते. मात्र, सामान्यतः समाजात ही जबाबदारी आईच पेलताना दिसते.
 
भारतात तर मूल वडिलांना घाबरतं, असं चित्र आहे. जुन्या काळी वडील घरात येताच घरातली पोरंसोरं आईच्या पदराआड लपायची. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर मुलींच्या तुलनेत मुलं जसजशी मोठी व्हायची तसे ते वडिलांसोबत वेळ घालवू लागायचे.
 
मात्र, मुलगी आणि वडील यांच्यात एक प्रकारचा दुरावा कायम असायचा. ती कधीच वडिलांसमोर ताठ मानेने उभी राहायची नाही.
 
कधी वडील मुलांसोबत वेळ घालवताना दिसले किंवा मुलांना कडेवर घेतलं की लोक त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर अशा शब्दात हिणवायचे.
 
घरातली वडीलधारी मंडळीसुद्धा सांगायची की वडिलांनी मुलांशी जास्त सलगी करू नये.
 
विकसित राष्ट्रांमध्ये मात्र परिस्थिती थोडी निराळी होती. असं असलं तरी तिथेसुद्धा मुलांच्या संगोपनाची महत्त्वाची जबाबदारी आईच पार पाडते. नोकरी करणारे आई-वडीलही स्वतःच्या अनुपस्थितीत मुलांची काळजी घेण्यासाठी एखादी आया नेमतात. आयाची भूमिका स्त्रीच निभावते. कारण एक स्त्रीच मुलाची चांगली काळजी घेऊ शकते, असा एक सर्वमान्य समज आहे.
 
मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासात पुरूषाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे.
 
जिथे बालसंगोपन आहे पुरुषांचं कार्यक्षेत्र
आतापर्यंत मुलांच्या विकासावर जे काही संशोधन झालं आहे, त्या सर्वांमध्ये केवळ आईच्याच भूमिकेवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. संगोपनात वडिलांचं असलेल्या महत्त्वाविषयी चर्चाच झालेली नाही.
 
जगात असे अनेक समुदाय आहेत जिथे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पुरूष उचलतात आणि ती मुलं सर्वांगाने उत्तम व्यक्ती म्हणून घडते. उदाहरणार्थ मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमधल्या एका समुदायात स्त्रिया बाहेर जाऊन कमावतात आणि पुरूष घरात मुलांची काळजी घेतात.
 
इथला समाज हा समानतेच्या मूल्यावर आधारित असला तरी समाजातल्या पुरूषांना सर्वोत्तम वडील असल्याचा किताब मिळाला आहे.
 
1970 पर्यंत मुलांच्या विकासात वडिलांच्या भूमिकेविषयी फारच कमी संशोधन झालं होतं. आत्तापर्यंत फक्त वडिलांच्या आर्थिक बाजूच्या महत्त्वाविषयीच संशोधन व्हायचं. मात्र, नव्या संशोधनात वडिलांच्या बालसंगोपनातल्या भूमिकेलाही समान महत्व देण्यात येतंय. यावरून मुलाच्या विकासात वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाचं असल्याचं समोर येतंय.
 
संशोधक असलेल्या मॅरियन बेकरमॅन सांगतात की आई आणि वडील दोघंही मुलासाठी गरजेचे असतात. मानसशास्त्रज्ञ मायकल लॅम्ब यांचं म्हणणं आहे की मुलाच्या विकासात केवळ वडीलच नाही तर सावत्र वडील, आजोबा, काका, मामा यांच्या भूमिकेवरही संशोधन करण्यात आलं आहे. यावरून कळतं की आजी, काकू, मावशी आणि आत्या यांच्याप्रमाणेच मुलाच्या संगोपनात त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
 
इस्रायलच्या संशोधक रूथ फिल्डमेन यांचं म्हणणं आहे की मुलांची काळजी घेतानाच्या काळात ज्या प्रकारचे हार्मोनल बदल आईमध्ये होतात तेच वडिलांमध्येही होतात. बाळाला सांभाळायची जबाबदारी आपलीदेखील आहे, हे जेव्हा त्यांचा मेंदू स्वीकारतो तेव्हा त्यांच्यामध्येही आईप्रमाणेच बाळाप्रती ओढ निर्माण होते.
 
संशोधनात असं आढळलं आहे की ज्या बाळांचं संगोपन वडिलांच्या देखरेखीत होतं त्यांना भविष्यात समाजात स्वतःच्या वागणुकीविषयी अडचणी येत नाहीत. उलट केवळ आईच्या देखरेखीखाली वाढणाऱ्या मुलांमधले बरेचसे गुण पूर्णपणे विकसित होऊ शकत नाहीत. इतकंच नाही तर ज्या मुलांचं त्यांचे वडील, आजोबा यांच्याशी चांगलं जमतं त्यांची त्यांचे शिक्षक आणि मित्रांशी असलेली वागणुकही संतुलित असते.
 
नाती कशी तयार होतात?
 
बाळाच्या संगोपनाची आई आणि वडील दोघांचीही पद्धत वेगवेगळी असते. आई मुलांची काळजी घेऊन, त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्याशी नातं घट्ट करते.
 
तर वडील मुलांसोबत खेळून, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्याशी नातं जुळवतात. बहुतांश मुलांना धाडस आवडतं. सामान्यपणे आई मुलांशी अशी वागत नाही. मुलं पडतील, त्यांना दुखापत होईल, या भीतीने ती मुलांना फार दंगामस्ती करू देत नाही.
 
पुरुषांच्या उपस्थितीत मुलांना त्यांना हवं ते करण्याची संधी मिळते आणि ते कसलीही भीती न बाळगता त्यांना आवडतं ते करतात. अशी मुलं अधिक निडर असतात.
 
Organisation for Economic Co-operation and Development म्हणजेच OECD देशांमध्ये बाळाचा जन्म झाल्यावर वडिलांच्या तुलनेत आईला अधिक मातृत्व रजा दिली जाते.
 
आई आणि वडील दोघांनाही सारखी रजा देणाऱ्या ब्रिटनसारख्या देशामध्येही खूपच कमी म्हणजे जवळपास 2% जोडपीच ही रजा घेतात.
 
मूल प्रत्येक काम हे खेळण्यातून शिकत असतं. संशोधनात आढळलं आहे की जे वडील मुलांच्या आकलन शक्तीचा विकास होण्याच्या काळात त्यांच्याशी खेळू लागतात त्यांचं त्यांच्या मुलांशी घट्ट नातं तयार होतं आणि त्यांच्यात इतर मुलांचा सामना करण्याचं धाडसंही येतं.
 
संशोधक पॉल रामचंदानी सांगतात की मुलं खेळण्यातूनच स्वतःचं जग निर्माण करतात. जे वडील मुलांना अधिक वेळ देतात त्यांच्या मुलांमध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचं धाडसं येतं. दोन वर्षाच्या वयात मुलं सर्व प्रकारचे आकार ओळखू लागतात. त्यांचा मानसिक विकास वेगाने होत असतो.
 
रामचंदानी यांचं म्हणणं आहे की वडिलांनी मुलं थोडी मोठी होण्याची वाट बघू नये. आईप्रमाणेच वडिलांनीही बाळ जन्मताच त्याच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली पाहिजे.
 
त्याला कुशीत घेऊन, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. बाळाला हे कळत नसतं. मात्र, त्याचं वडिलांसोबत नातं तयार व्हायला सुरुवात होते. मात्र, आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, अशी भीती बहुतांश वडिलांना असते.
 
मात्र, हीच भावना नव्याने आई होणाऱ्या स्त्रीचीही असते. काही पुरुषांना नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी जमत असतात. मात्र, बहुतांश पुरुषांना ही कला अवगत करावी लागते. आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. वडील आणि मुलांच्या नात्यावर अनेक प्रकारचे व्हीडिओ ऑनलाईन उपलब्ध आहेत.
 
परदेशांमध्ये तर याविषयावर खास शिकवणी वर्गही असतात. परिस्थिती बदलत आहे. तरीदेखील जगभरात बालसंगोपनाची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावर आईच पार पाडत असते.
 
या कामातही पुरुषांनी स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ आता आली आहे. हे त्यांच्या मुलांसाठीही फायद्याचं ठरेल.