प्रवीण मुधोळकर,
शनिवारी राज्यात राजकीय परिघात आरोप-प्रत्यारोप होत असताना अवकाशातल्या घडामोडींनी राज्यातले नागरिक चकित झाल्याचं दिसून आलं. शनिवारी संध्याकाळी आणि रात्री राज्याच्या विविध भागात प्रकाशमान आगेचा लोळसदृश आकाशातून जाताना दिसलं.
चित्रपटांमध्ये शोभावं अशा या घडामोडीने तर्कवितर्कांना उधाण आलं. हा उल्कापात आहे का का उपग्रहाचे तुकडे आहेत का विदेशी देशांनी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली कूटमोहीम आहे अशा अनेक शक्यतांविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली.
"शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती ती लाल तप्त होती. ती एवढ्या जोराने जमिनीवर पडली की मातीमध्ये ती रुतली. ही रिंग आठ फुटाच्या व्यासाची आहे. आम्ही ती स्थानिक पोलीस स्टेशनला जमा केली आहे." सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली.
हे एखादे जुने सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळलं असां, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. या वस्तू आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे गोंडपिपरी, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातही दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हे तुकडे 'इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर'चे असल्याचे खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद यांनी बीबीसीला सांगितले. "न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरील भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.
आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या 'इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचे'च असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चित." श्रीनिवास औंधकर या घटनेसंदर्भात सांगत होते.
नागपूर शहरातून आकाशात संध्याकाळी 7 वाजून 47 वाजता रहस्यमय प्रकाश दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून प्रवास करत होते. नागपूर शहरातील अनेक भागातील लोकांनी हा प्रकाश पाहिला. अनेकांनी आकाशातील प्रकाशाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढले. हा प्रकाश जवळपास 15 सेकंदापर्यंत आकाशात दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितले.
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (Jet Propulsion Laboratory) 2 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीच्या जवळ पाच मोठे लघुग्रह जाणार असल्याचे जाहिर केले होते. 2022FQ, 2016 GW221, 2022 FE2, 2021 GN1 and 2022 FJ1 असे या asteroids चे नाव आहेत. NASA च्या शास्त्रज्ञांनी अंतराळातील लघुग्रहांना नावे दिली आहेत. हे पाच लघुग्रह 18-40 मीटर एवढ्या आकाराचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. NASA च्या वेबसाईवर ही माहिती देण्यात आली आहे.
"आकाशातील या प्रकाशाचा भारतीय वायू सेना किंवा भारतीय सैन्य दलाच्या कुठल्याही अभ्यासाचा किंवा सरावाचा संबंध नाही.", अशी माहिती वायुसेनेचे प्रवक्ते रत्नाकर सिंग यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
खगोल अभ्यासक सुरेश चोपणे या संदर्भात सांगतात," 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी हे प्रकाश दिसले. पश्चिमेकडून हा प्रकाश पूर्वेकडे गेला. हा विदर्भाच्या आकाशातून गेला. एखादा तुकडा त्याचा पडला असल्याची शक्यता आहे. पण हे कुठे पडले हे सांगता येणार नाही. एखादा जूना सॅटेलाईट असावा किंवा सॅटेलाईटचा बुस्टर रॉकेटचा पार्ट असावा अस प्रथमदर्शनी वाटतं."
उल्का / अशनी पडण्याची कारणे काय हे सांगतांना प्रा सुरेश चोपणे, " अवकाशात फिरत असलेले काही मीटर आकाराचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणार्या घर्षणाने जळायला लागतात. बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित वेळी (लाखात एक वेळा) यातील न जळलेला एक दोन किलो वजनाचा तुकडा जमिनीवर पडू शकतो. मोठ्या आकाराची उल्का पडल्या मुळे प्राचीन काळात डायनोसार नष्ट झाले होते."
" उल्का पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आज बघायला मिळालेला उल्कापात नसुन कदाचित एखाद्या अवकाश यानाचे, अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असु शकतात." असेही प्रा सुरेश चोपणे यांनी बीबीसीला सांगितले.
शनिवारी रात्री आकाशात दिसलेल्या रहस्यमय प्रकाशाचं गूढ वाढलं आहे. एकीकडे काही स्थानिक कुतुहूल व्यक्त करत असताना काही जण मात्र संभ्रमात आहेत. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आकाशात घडणाऱ्या या घडामोडींबद्दल नागरिकांना कुतुहल निर्माण झाले आहे. नागपुरात रामदासपेठ. बेसा, जयताळा, आणि इतर अनेक भागात आकाशात हे प्रकाशाचे गोळे दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अनेकांनी या व्हिडिओचे फोटो आणि व्हिडिओ काढले. नागपूरच नाही तर खामगाव, यवताळ, भंडारा, अमरावती येथील नागरिकांनीही या घटनेचे व्हिडिओ मोबाईलवर एकमेकांना पाठविले.