शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मुस्लिम तरुणींनी शंकराच्या मंदिरात केला जलाभिषेक?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. यात काही बुरखाधारी तरुणी हातात कावड घेऊन जाताना दिसत आहेत. या व्हिडियोसोबत लिहिलंय की 'हलाला आणि तलाक (घटस्फोट) होऊ नये, यासाठी काही मुस्लीम तरुणींनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातल्या प्राचीन शिव मंदिरात पाणी अर्पण केलं.'
 
ट्विटर आणि फेसबुकवर गेल्या 48 तासात हा व्हिडियो शेकडो वेळा शेअर करण्यात आला आणि सात लाखांहून अधिकवेळा बघितला गेला. काही बुरखाधारी महिला हातात कावड घेऊन असल्याचं आणि इतर महिलांनी भगवी वस्त्र नेसल्याचं या व्हिडियोमध्ये दिसत आहे. एक मिनिटाचा हा व्हिडियो ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर शेअर केला त्या सर्वांनीच जवळपास एकसारखाच संदेश लिहिला आहे.
 
हा संदेश आहे, "हजारो मुस्लीम तरुणी कावड घेऊन देवघरमध्ये अर्घ्य अर्पण करायला निघाल्या. तीन तलाकपासून मुक्ती मिळावी, यासाठी या तरुणींनी देवाकडे हिंदू मुलांसोबत लग्न होऊ दे, हे मागणं मागितलं. भोलेनाथ यांची मनोकामना पूर्ण करो." मात्र, आम्ही केलेल्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. हा व्हिडियो झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यातला नाही तर मध्य प्रदेशातल्या इंदूरचा आहे.
 
व्हिडियोचं वास्तव
रिव्हर्स इमेज पडताळणीत आम्हाला आढळलं की मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 2015 आणि 2016 या सलग दोन वर्षी विशेष कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मुस्लीम स्त्रियांनीही भाग घेतला होता. मध्य प्रदेशातल्या 'सांझा संस्कृती मंच' नावाच्या एका संस्थेने या यात्रेचं आयोजन केलं होतं.
 
काही वर्षांपूर्वी झालेल्या या कावड यात्रेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी प्रशांत चाहल यांनी या संस्थेचे संयोजक सेम पावरी यांच्याशी संपर्क साधला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडियो 14 ऑगस्ट 2016 रोजीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. सेम पावरी मध्य प्रदेशातल्या शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि मध्य प्रदेशातल्या अल्पसंख्याक आयोगातही त्यांनी काम केलं आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही दोन वर्षं ही सद्भावना कावड यात्रा आयोजित केली होती. 2015 साली जवळपास 1,300 मुस्लीम महिलांनी यात भाग घेतला होता. तर 2016 साली चार हजारांहून जास्त मुस्लीम महिला सहभागी झाल्या होत्या."
 
"दोन्ही वेळा ही यात्रा इंदूर शहरातच आयोजित करण्यात आली होती. जो व्हिडियो चुकीच्या संदेशासह सध्या व्हायरल होत आहे ती कावड यात्रा इंदूरमधल्या गांधी हॉलपासून सुरू होऊन गोपेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून संपन्न झाली." सेम पावरी पारसी समाजाचे आहेत. ते सांगतात केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले नरेंद्र सिंह तोमर या यात्रेचे प्रमुख पाहुणे होते. तसंच सर्वच धर्मातल्या काही धर्मगुरुंनाही यात्रेत आमंत्रित करण्यात आलं होतं.
 
सांकेतिक यात्रा
त्यांनी सांगितलं, "आम्ही हिंदू आणि मुस्लीम धर्मगुरुंशी चर्चा करूनच या यात्रेची आखणी केली होती. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. मुस्लीम महिलांनी कावड खांदी घेऊन जवळपास दिड किमीची यात्रा पूर्ण केली होती. त्यानंतर मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यासाठी कावड हिंदू महिलांना देण्यात आल्या."
 
हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी जी कावड यात्रा काढली त्याच यात्रेचा व्हिडियोचा वापर आज धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी केला जात आहे, यावर आम्ही सेम पावरी यांची प्रतिक्रिया विचारली. ते म्हणाले, "हे खूप दुःखद आहे. ज्यावेळी आम्ही ही सांकेतिक यात्रा आयोजित केली होती त्यावेळीदेखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते." "मुस्लीम महिला अशाप्रकारे हिंदूंच्या धार्मिक आयोजनात सहभागी होऊ शकतील, यावर अनेकांचा विश्वासच बसला नव्हता. याच कारणामुळे मुस्लीम महिलांना आपलं मतदान ओळखपत्र गळ्यात घालून यात्रेत सहभागी व्हावं लागलं होतं."