शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'मुसलमानांना जर गटारातच रहायचं असेल, तर...'

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदींनी शाहबानो प्रकरणाचा उल्लेख करत एका काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधानाचा संसेदत पुनरुच्चार केला.
 
'मुसलमानांचा उद्धार करण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही. जर त्यांना गटारातच रहायचं असेल, तर राहू द्यावं, असं विधान एका काँग्रेस नेत्यानं केलं होतं,' असं मोदींनी त्यांच्या या भाषणात म्हटलं.
 
नेमक्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हे विधान केलं होतं, हे मात्र नरेंद्र मोदींनी भाषणात सांगितलं नाही. जेव्हा काँग्रेसकडून हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मोदींनी त्यांना आपण युट्यूब लिंक पाठवून देऊ, असं सांगितलं.
 
राजीव गांधी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या आरिफ मोहम्मद खान यांनी हे विधान केलं होतं. मोदींच्या भाषणानंतर त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं, "सहा-सात वर्षांपूर्वी एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये मला विचारण्यात आलं, की (शाह बानो प्रकरणानंतर) माझ्यावर राजीनामा परत घेण्यासाठी कशाप्रकारे दबाव टाकण्यात आला. राजीनामा देऊन मी माझ्या घरातून निघून गेलो, असं मी त्यांना सांगितलं."
 
आरिफ मोहम्मद खान पुढे सांगतात, "दुसऱ्या दिवशी संसदेत मला अर्जुन सिंह भेटले. मी जे केलं ते तात्विक दृष्ट्या योग्य आहे, पण यामुळे पक्षासमोरच्या अडचणी वाढतील, असं मला ते वारंवार सांगत होते. नरसिंह रावही तेव्हा मला म्हणाले होते, की तू खूप हट्टी आहेस. आता तर शाह बानोनेही आपली भूमिका बदलली आहे"
 
लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींनी आरिफ मोहम्मद खान यांच्या विधानाचा जो उल्लेख केला, त्याबद्दल बोलतान खान यांनी म्हटलं, "माझ्या मुलाखतीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी असं सुचवण्याचा प्रयत्न केला आहे की समाजाचा एक घटक सत्तारूढ पक्षांना त्यांना धोका देण्याचा अधिकार कधीपर्यंत देत राहील. हा अगदी स्पष्ट संदेश आहे."
 
आरिफ मोहम्मद खान यांनी मुलाखतीत काय म्हटलं होतं?
आरिफ मोहम्मद खान यांच्या ज्या मुलाखतीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी दावा केला होता, की "मुसलमान आपले मतदार आहेत. त्यांना का नाराज करायचं, असं स्वतः नरसिंह राव यांनी मला म्हटलं होतं. काँग्रेस पक्ष हा समाज सुधारण्याचं काम करत नाही. आपली भूमिका समाज सुधारकाची नाही. आपण राजकारणात आहोत आणि जर त्यांना गटारातच राहायचं असेल तर तसंच राहू दे."
 
अनेक मीडिया वेबसाईट्सवर आरिफ मोहम्मद खान यांच्या त्या जुन्या मुलाखतीचे भाग उपलब्ध आहेत. त्या मुलाखतीमध्ये आरिफ मोहम्मद खान यांनी हे देखील म्हटलं होतं, की शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलण्यासाठी राजीव गांधींवर दबाव टाकण्यात आला होता.
 
दबाव टाकणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंह आणि एन. डी. तिवारींचा समावेश होता. हे सगळे तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होते.
 
आता भाजपने या प्रकरणावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या आय. टी. सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पंतप्रधान मोदींचं भाषण आणि आरिफ मोहम्मद खान यांच्या जुन्या मुलाखतीचा एक भाग जोडून ट्वीट केलंय.
 
इतकी वर्षं सत्तेत असूनही काँग्रेसनं समान नागरी कायदा लागू करण्याची संधी दवडली, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.
 
ओवेसींचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर
 
"पंतप्रधानांना शाहबानो आठवते, अखलाक आठवत नाही," या शब्दांत एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधानांच्या विधानावर टीका केली.
 
ओवेसी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, की त्यांच्याच मंत्र्यांनी अलीमुद्दीन अन्सारीच्या मारेकऱ्यांना हारतुरे घातले होते, हे पंतप्रधान विसरलेले दिसतात.
 
मुसलमान मागास आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना आरक्षण का देत नाही? तुमच्या पक्षाकडून एकही मुस्लीम खासदार का निवडून आला नाहीये? असे प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केले.