शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (17:00 IST)

पहिला कॉम्प्युटरः जगातल्या सर्वांत जुन्या 'कॉम्प्युटर'चं रहस्य उलगडलं

जगातला 'सर्वांत जुना कॉम्प्युटर' नव्याने तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. हे यंत्र तब्बल 2 हजार वर्ष जुनं आहे. पण, शास्त्रज्ञांना हे उपकरण नव्याने बनवावं, असं का वाटलं? ते कसं काम करायचं? हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
1901 साली ग्रीकमध्ये रोमन काळातल्या एका तुटलेल्या जहाजाच्या अवशेषामध्ये हे यंत्र सापडलं होतं. याला 'अँटिकाईथेरा मेकॅनिझम' म्हणतात.
या अँटिकाईथेरा यंत्रणेच्या माध्यमातून रोमन काळात ग्रहांची स्थिती, ग्रहणाच्या तिथी, इतर खगोलीय घटना आणि तारखा यांची गणना व्हायची. प्राचीन ग्रीक उपकरण असलेलं हे 'अँटिकाईथेरा मेकॉनिझम' अनेक अर्थांनी हा एक 'अॅनालॉग कॉम्प्युटर' होता.
मात्र, या यंत्राचा केवळ एक तृतियांश भागच सुरक्षित राहिला. त्यामुळे हे यंत्र काम कसं करायचं, हे कोडं शास्त्रज्ञांना पडलं होतं. तब्बल एका शतकानंतर त्याचं उत्तर मिळाल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे.
सुरुवातीच्या अभ्यासातून या यंत्राच्या मागचा भाग कसा काम करायचा, हे कळलं. पण, यंत्राच्या दर्शनी भागी असलेली क्लिष्ट गिअरिंग यंत्रणा आता-आतापर्यंत गूढच होती.
मात्र, यंत्राच्या 3D कॉम्प्युटर मॉडलिंगच्या मदतीने हे कोडं सोडवल्याचा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (UCL) शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांनी यंत्राचा संपूर्ण फ्रंट पॅनल नव्याने तयार केला आणि आता यापुढे जात आधुनिक साहित्याचा वापर करत अँटिकाईथेराची संपूर्ण, एकसंध प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा इरादा आहे.
या यंत्रासंबंधीचा अभ्यास पेपर नुकताच 'Scientific Reports' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नव्याने तयार करण्यात आलेली गिअरिंग सिस्टिम दाखवण्यात आली आहे. गिअरिंग सिस्टिमचे बारिक-सारिक तपशील आणि कॉम्प्लेक्स पार्ट्स या सर्वांकडे शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष दिलं आहे.
या पेपरचे मुख्य लेखक प्रा. टोनी फ्रिथ म्हणतात, "अत्यंत कौशल्याने तयार करण्यात आलेल्या या प्राचीन ग्रीक मास्टरपीसमध्ये सूर्य, चंद्र आणि ग्रह प्रभावी पद्धतीने दाखवले आहेत."
ते पुढे म्हणतात, "सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व भौतिक पुराव्यांशी आणि प्राचीन यंत्रावरच कोरलेल्या वैज्ञानिक वर्णनाशी जुळणारं, असं आमचं मॉडेल आहे. अशाप्रकारचं हे पहिलंच मॉडेल आहे."
या यंत्राला पहिला अॅनालॉग कॉम्प्युटर सोबतच 'खगोलीय कॅलक्युलेटर' असंही म्हणतात. ब्रॉन्झ धातूपासून हे यंत्र बनवण्यात आलं होतं आणि यात बरेच गेअर्स होते.
यंत्राच्या मागच्या बाजूला ब्रह्मांडाचं वर्णन दिलंय. यात यंत्र तयार करण्यात आलं त्यावेळी ज्ञात असलेल्या पाच ग्रहांची गती दर्शवण्यात आली आहे.
मात्र, या यंत्राचे केवळ 82 तुकडे सापडले आहेत. हा संपूर्ण यंत्राचा एक तृतियांश भाग आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी प्राचीन ग्रीक गणित आणि एक्सरे डेटा वापरून यंत्राचा उर्वरित भाग तयार केला.