शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (18:08 IST)

थेरगाव क्विन नेमकी कोण आहे, ती शिव्याचे व्हीडिओ का पोस्ट करते?

अश्लील भाषेत शिव्यांचे व्हीडिओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तथाकथित पिंपरी चिंचवडमधील 'थेरगाव क्विन'ला पोलिसांनी अटक केली आहे.
 
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ संबंधित तरुणी पोस्ट करत असल्याने आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तरुणीला अटक केली आहे. त्या तरुणीला समज देऊन तिची जामीनावर सुटका झाली आहे.
 
'थेरगाव क्विन' या नावाने साक्षी हेमंत श्रीमल (वय 18 ) ही तरुणी इन्स्टाग्राम अकाऊंट चालवत होती. तिच्या साथीदारांसोबत मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हीड्ओ तिने तयार केले आहेत.
 
या मुलीला हजारो तरुण फॉलो करत होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीला रविवारी (30 जानेवारी) अटक केली. अटक केल्यानंतर तरुणीने गुन्हा कबूल करुन माफी देखील मागितली.
 
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं, "घटनेचे गांभीर्य पाहून त्या तरुणीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे अशा गोष्टींना नक्कीच आळा बसेल. असे व्हीडिओ बनविणारे तरुण पुढे गुन्हेगारीकडे वळतात. ते गुन्हेगारीकडे जाऊ नयेत म्हणून अशा तरुणांना वेळेत आळा घालणे गरजेचे आहे. जे काही बेकायदेशीर असेल त्यावर पोलीस पुढेही कारवाई करणारच."
 
पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. तिला आई वडील नाही त्यामुळे तिचा सांभाळा तिची आजी करते. साक्षी सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे.
 
तिने शिवीगाळ करणारे, अश्लील भाषा असलेले अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिळाणाऱ्या लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हीडिओ तयार केले, अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.
 
लाईक्स आणि प्रसिद्धीसाठी काहीपण
लाईक्स आणि प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे अनेक व्हीडिओ तरुण तयार करत असल्याचं पुणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितलं.
 
हाके म्हणाले, "सोशल मीडियावर काय चालू आहे हे पाहण्यासाठी आमचे वेगवेगळे विभाग आहेत. सोशल मीडियावरच्या गोष्टींच मॉनिटरींग होत असतं. विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित पोलीस गुन्हा दाखल करुन कारवाई करतात."
 
"सध्या तरुण सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह गोष्टी करतात. तलवारीने केक कापणे, लोकल भाई, दादाची मिरवणूक काढणे अशा गोष्टी केल्या जातात. अशा लोकांना फॅालोअर्स देखील मोठ्या प्रमाणावर असतात. बेकारी वाढल्यामुळे सुद्धा अनेक तरुण अशा गोष्टींकडे वळत आहेत.
 
तरुणांना असे व्हीडिओ तयार करण्याआधी भान असलं पाहिजे की, यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. लोकांना परिणामाची जाणीव नसते त्यामुळे अशा गोष्टी केल्या जातात. या कारवाईमधून तरुणांनी बोध घेतला पाहिजे," असं देखील हाके म्हणाले.
 
तरुणांचं समुपदेश गरजेचं
मानसिकदृष्ट्या याचा विचार केला तर याची अनेक कारणं असू शकतात. एखाद्याला घरून प्रेम मिळालं नाही किंवा कोणी नाकारलं आहे तर अशावेळी बदला घेण्यासाठी, आपण कसे फेमस आहोत हे दाखविण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात, असं मानसोपचार तज्ज्ञ दीपा राक्षे सांगतात.
 
सतत चर्चेत राहण्यासाठी निगेटिव्ह प्रसिद्धी मिळाली तरी चालेल अशा विचारातून देखील असे व्हीडिओ केले जातात, असं देखील राक्षे यांना वाटतं.
 
राक्षे म्हणाल्या, "अशा तरुणांच समुपदेशन करणं गरजेचं आहे. अशा घटना एका दिवसात घडत नाहीत. त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुठलीतरी घटना घडलेली असते. त्याचं परिवर्तन यात झालेलं असतं. त्यामुळे अशी एखादी गोष्ट लक्षात येत असेल तर घरच्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे."
 
सोशल मीडियावर कॉन्टेंट तयार करायचा असेल तर काय करायचं?
सोशल मीडिया वापरायला सोपा आणि झटपट प्रसिद्धी मिळत असल्याने अनेक तरुण आता याकडे करिअर म्हणून देखील पाहत आहेत. परंतु केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी तयार करणं आणि या क्षेत्रातलं योग्य ज्ञान घेऊन कॉन्टेंट तयार करणं यात फरक असल्याचं कॉन्टेंट क्रिएटर सुशांत घाडगे सांगतो.
 
सुशांत म्हणतो, "या क्षेत्रात कसे व्हीडिओ तयार करायचे याचं ज्ञान नसेल तर त्याचे वेगळे परिणाम झालेले पाहायला मिळू शकतात. सुरुवातीला कसेही व्हीडिओ पोस्ट केले तरी लोक ते बघतायेत त्यावर प्रतिक्रिया देतायेत असं दिसून येतं. त्यावरुन हेच उत्तम आहे असं काही तरुणांना वाटतं. त्यामुळे या मुलीच्या घटनेच्या निमित्ताने अशा गोष्टींचे काय परिणाम होतील याचा देखील विचार करायला हवा."