शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (16:39 IST)

कोरोनाची लस घेतल्यानंतरही संसर्ग झालेले डॉक्टर 'लस घ्याच' असं का म्हणतायेत?

सरोज सिंह
पूर्वसूचना : हा अनुभव सरकारी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. पुनीत टंडन यांचा आहे. डॉ. पुनीत भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पॅथोलॉजीतज्ज्ञ म्हणून काम करतात.
 
53 वर्षांच्या डॉ. पुनीत यांना इतर कोणताही आजार नाही. कोरोनावरील लस (कोव्हिशिल्ड) घेतल्यानंतरही त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली. त्यांच्या पत्नी भूलतज्ज्ञ आहेत. त्या कोव्हिड आयसीयूमध्ये काम करतात. त्यांची बहीण पॅथोलॉजी विभागात काम करते. डॉ. पुनीत यांचा अनुभव वाचताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉ. पुनीत यांचा अनुभव तुम्हाला घाबरवण्यासाठी आम्ही सांगत नाही.
 
"15 जानेवारी 2021 रोजी मला मेसेज आला. तुम्हाला कोरोनावरील लस मिळणार आहे. मी खूप आनंदी होतो. कोव्हिड-19 विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांना मी फार जवळून पाहिलं आहे. प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने मी रुग्णांवर उपचार केले आहेत. माझी पत्नी कोव्हिड आयसीयूमध्ये उपचार देते. मला वाटलं, आता मला कोरोनाविरोधात कवच मिळालं."
 
16 जानेवारीला मला कोव्हिडविरोधी लस देण्यात आली. लसीकरण केंद्रावर अर्धातास थांबल्यानंतर मला काहीच साइडइफेक्ट जाणवला नाही. पॅथोलॉजी डॉक्टर असल्या कारणाने लस घेण्याआधी मी अॅन्टीबॉडी टेस्ट केली होती. पहिल्या डोसआधी शरीरात अॅन्टीबॉडी लेव्हल 0.05 होती. लस घेतल्यानंतर ती वाढून 0.88 झाली.
कोव्हिडविरोधी लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 38 दिवसानंतर 24 फेब्रुवारी 2021 ला मला दुसरा डोस देण्यात आला. त्याआधी एक दिवस शरीरात अॅन्टीबॉडी लेव्हल 2.28 होती. याचा अर्थ, माझ्या शरीरात हळूहळू रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास सुरूवात झाली होती. लसीकरणानंतरच्या सर्व नियमांचं मी पालन केलं.
पण 30 मार्चला सकाळी मला शरीरात काही टोचल्यासारखं जाणवू लागलं. मी रोज जॉगिंग करतो. त्यामुळे, दुखण्याकडे फारसं लक्ष न देता मी, व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो. पण, मला दमल्यासारखं वाटू लागलं. मला 10 किलोमीटर धावण्याचा सराव आहे. त्यामुळे मी फारसं लक्ष दिलं नाही. पण मला जाणवत होतं, माझ्या हृदयाचे ठोके सामान्य दिवसापेक्षा जास्त आहेत. मी रुग्णालयात गेलो, काम केलं. पण संध्याकाळी मला थोडी सर्दी जाणवली आणि थंडी लागण्यास सुरूवात झाली.
 
दुसऱ्या दिवशी 31 मार्चला मला ताप आला. साधारण 99 असेल. माझ्या मनात विचार आला, कोरोना तर नाही? पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, मी लशीचे दोन डोस घेतले आहेत. मग असं कसं होईल? मी डॉक्टर असल्याने, लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होऊ शकतो याची मला कल्पना होती. रॅपिड अॅन्टीजिन टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला डॉक्टरांनी घरीच आयसोलेट होण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी घरीच आयसोलेट झालो.
 
कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर मित्राकडून उपचारांचा प्रोटोकॉल समजून घेतला. काही रक्त तपासण्या केल्या. छातीचा सीटी स्कॅन केला. डॉक्टर असल्याने जास्त खबरदारी घेतली.
रक्त तपासणी रिपोर्टमध्ये फार गंभीर चिंतेची गोष्ट नव्हती. छातीच्या सीटी स्कॅनमध्ये सर्व नॉर्मल होतं. डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधं घेतली. एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतलं. पण दोन दिवस 99-100 पर्यंत ताप कायम होता. तिसऱ्या दिवशी ताप येणं बंद झालं.
 
6 एप्रिलला पुन्हा RTPCR तपासणी केली. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण मी अजूनही घरीच आयसोलेशनमध्ये आहे.
 
माझ्या वयोवृद्ध आई-वडील घरी असल्याने गेल्यावर्षापासून त्यांच्यापासून लांबच राहिलो. पत्नी आणि मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली. पण माझी बहीण कोरोना पॉझिटिव्ह होती.
मला माहित नाही, मला कोरोनाचा संसर्ग कसा आणि कुठे झाला. मी पूर्ण खबरदारी घेतली होती. पण डॉक्टर असल्याने मी अनेक रुग्णांच्या संपर्कात आलो होतो.
 
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला गंभीर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. रुग्णालयात दाखल व्हावं लागलं असतं, कदाचित जीव गमवावा लागला असता. जर मी कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस घेतले नसते. लस घेतल्यामुळे मला कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला नाही. तुम्हीसुद्धा लस जरूर घ्या. लस घेतल्यानंतरही तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, पण हा संसर्ग गंभीर नसेल.
 
"लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा, मास्क वापरा आणि हात जरूर धूत रहा."
 
डॉ. पुनीत यांचा अनुभव ऐकल्यानंतरही, तुमच्या मनात कोव्हिड लस घेण्यासंदर्भात काही संशय आहे?
 
प्रश्न-कोरोना लस घेतल्यानंतरही डॉ. पुनीत यांना संसर्ग का झाला?
 
उत्तर- लस घेतल्यानंतर आपण कसे वागतो याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मात्र, कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. यासाठीच कोरोनाविरोधी लस किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास केला जातो. आतापर्यंत लसनिर्माण करणाऱ्या कोणत्याही कंपनीने लस 100 टक्के सुरक्षित असल्याचं सिद्ध केलं नाहीये.
 
भारतात निर्माण केली जाणारी कोव्हॅक्सीन 80 टक्के सुरक्षित असल्याचा दावा केला जातोय. याचा अर्थ, लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता 20 टक्के आहेच.
कोव्हिशिल्ड लशीची सुरक्षितता 70 टक्क्यांच्या आसपास आहे. लशीचे दोन डोस कधी घेतले जातात. यावर लस किती प्रभावी आहे हे कळतं. पहिला डोस घेतल्यानंतर दोन महिन्यांनी दुसरा डोस घेतल्यास लस अधिक प्रभावी आहे.
 
प्रश्न-कोरोना लस मग का घ्यावी?
 
उत्तर- लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाचा गंभीर संसर्ग होणार नाही. अत्यंत सौम्य स्वरूपाचा किंवा लक्षणं नसलेला संसर्ग होण्याची शक्यता मात्र असते. त्यामुळे कोव्हिडविरोधात सुरक्षा कवच नसणं किंवा एक सुरक्षाकवच असणं यामध्ये तुम्ही काय निवडाल?
 
त्यामुळे लस प्रत्येकाने घेतली पाहिजे. सोप्या शब्दात सांगायचं तर एकदा लस घेतल्यानंतर शरीरात मेमरी सेल्स तयार होतात. कोरोना व्हायरसविरोधात कसं लढायचं हे त्या सेल्स लक्षात ठेवतात.
 
प्रश्न- कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड लशीने किती दिवस सुरक्षित राहू शकतो?
 
उत्तर- आतापर्यंत करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये लस घेतल्यानंतर लोक एक वर्ष सुरक्षित राहू शकतात असं दिसून आलंय. पण यावर अजूनही चाचण्या सुरू आहेत.
 
प्रश्न- इतर आजार असलेल्यांना लस घेतल्यानंतर घेतल्यानंतर धोका जास्त आहे का?
 
उत्तर- इतर आजार असलेल्यांसाठी लस हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यांना सौम्य स्वरूपाचा संसर्ग झाला तरी धोकादायक ठरू शकतो. लशीमुळे संसर्गशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते.