रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 30 एप्रिल 2018 (12:04 IST)

तृष्णात्याग, नैतिकता आणि धम्म

आज भगवान बुद्ध जयंती. त्या निमित्त ...
 
तृष्णात्याग म्हणजे धम्म...
 
* धम्मपदात बुद्ध म्हणतात, 'आरोग्यासारखा श्रेष्ठ लाभ नाही. संतोषासारखे श्रेष्ठ धन नाही.'
 
* येथे संतोषाचा अर्थ दीनपणा अथवा परिस्थितीला शरण जाणे असा नाही. 
 
* असे समजणे हे बुद्धाच्या शिकवणीविरुद्ध आहे. 
* 'निर्धन लोक धन्य आहेत' असे बुद्धाने कोठेही म्हटले नाही. * 'पीडितांनी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयास करू नये.' असे बुद्धाने कोठेही म्हटले नाही.
* या उलट बुद्ध म्हणतो, 'संपन्नतेचे स्वागत असो. प्राप्त परिस्थितीत उपेक्षित जिणे जगण्यापेक्षा वीर्यपूर्वक (प्रयत्नपूर्वक) परिस्थिती परिवर्तनाचे प्रयास श्रेयस्कर आहेत.' * या उलट बुद्ध म्हणतो की, संतोष हे श्रेष्ठतम धन आहे. तेव्हा त्याचा अर्थ माणसाने लोभाच्या आहारी जाऊ नये असा आहे. कारण लोभाला सीमा नाही. * जसे भिक्खू रठ्ठपालने म्हटले आहे, 'मी अनेक धनवान पाहिले, जे मूर्खतावश कधीही दान करीत नाहीत. ते अधिकाधिक संग्रह करतात. त्यांची धनतृष्णा कधीच शमत नाही. एखाद्या राजाने सागरापर्यंत पृथ्वी पादाक्रांत केली तरीही सागरापलीकडे पृथ्वी पादाक्रांत करण्याची त्याची आकांक्षा असतेच. त्याची तृष्णा जिवंत असतेच. असे राजे, महाराजे आणि सामान्यजन येतात आणि जातात. परंतु त्यांची तृष्णा, अभावाची भावना कायमच राहते. ते देहत्याग करतात तरीही या पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत त्यांची कामेच्छांची तृप्ती कधीच होत नाही.' * महानिर्वाण सुत्त्कात बुद्धाने आनंदाला लोभ नियंत्रणाची महती कथन केली. बुद्ध असे म्हणाला की, * आनंद, हे असे आहे की, लोभाची इच्छाच तृष्णेची जननी आहे. जेव्हा लोभाची इच्छा स्वामित्वाच्या इच्छेत परिवर्तित होते तेव्हा या स्वामित्वाची इच्छा आपणास मिळाले ते आपणाशीच राहावे या इच्छेत परिवर्तित होते. तेव्हा या इच्छेचे लोभात परिवर्तन होते.' * लोभ, अर्थात अन्यथा संग्रहाच्या असंयत कामनेवर नजर ठेवणे आवश्क आहे. नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
* या तृष्णेचा किंवा लोभाचा का धिक्कार करावा? बुद्ध आनंदास म्हणाले, 'कारण यातून अनेक दुष्ट आणि वाईट गोष्टींचा उद्‌भव होतो. यातून हाणामारी, जखमी करणे, भांडणतंटा, घात-प्रतिघात, विरोध आणि संघर्ष उद्‌भवतात. यातून कलह, निंदा आणि मिथ्या कथन आदी प्रवृत्ती प्रसवतात.'
* वर्ग संघर्षाचे हे अप्रतिम आणि सत्य विश्लेषण आहे. यात शंकाच नाही. * म्हणूनच बुद्धाने तृष्णा आणि लोभ यावर नियंत्रण ठेवण्याचा उपदेश केला आहे.
 
नैतिकता आणि धम्म 
* धम्मकात नैतिकतेचे स्थान का? * याचे साधे सरळ उत्तर असे आहे की, 'धम्म म्हणजे नैतिकता आणि नैतिकता म्हणजे धम्म.' * दुसर्‍या शब्दात नैतिकतेला धम्मात ईश्वराचे स्थान प्राप्त झाले आहे. धम्मात ईश्वराला स्थान नाही. तरीही इतर धर्मात ईश्वराला जे स्थान आहे तेच स्थान धम्मात नैतिकतेला आहे. * धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, धर्मविधी, यज्ञयाग यांना कोणतेही स्थान नाही. * नैतिकता हे धम्माचे सार आहे. नैतिकतेशिवाय धम्मच नाही. नैतिकता नाही म्हणजे धम्म नाही. * माणसाने माणसांशी मैत्री करावी. माणसाने माणसांवर प्रेम करावे. या आवश्यकतेपोटी धम्मात नैतिकता उदय पावली आहे. * याला ईश्वराच्या अनुज्ञेची आवश्यकता नाही. माणसाने नीतिवान होणे ईश्र्वराला प्रसन्न करणसाठी नाही. हे मानवाच्या स्वतःच्या हितासाठी, कल्याणासाठी आवश्यक आहे की त्याने माणसावर प्रेम करावे, मैत्री करावी.
 
बी. के. तळभंडारे