श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार
श्री गजानन विजय ग्रंथ याचे पारायण केल्याने इष्ट फळ प्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन तसेच एकदा तरी पारायण करावे असे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णित आहे. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार या प्रकारे आहेत-
एकआसनी पारायण : हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जातं. एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण केलं जातं. संतकवी दासगणूनी यांनी गुरुपुष्यामृत योगावर एक आसनी पारायण करण्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले आहे.
एकदिवसीय पारायण : हे पारायण एका दिवसात आपल्या सवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जातं.
तीन दिवसीय पारायण : सलग तीन दिवस हे पारायण करण्याची पद्धत असते. यात दररोज सात-सात अध्याय किंवा 9, 7, 5 अध्याय वाचून पारायण केलं जातं. संतकवी दासगणूनी यांनी दशमी, एकादशी व द्वादशी या प्रकारे पारायण करण्याचे महत्त्व सांगितले आहे.
साप्ताहिक पारायण : सलग सात दिवस ज्यात दररोज 3 अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जातं. गजानन महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील करता येतं.
गुरुवारचे पारायण : गुरुवार हा गुरुचा दिवस आणि शुभदिन म्हणून 21 भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचणे आणि सगळे मिळून 21 अध्यायाचे पारायण पूर्ण करणे अशी पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते. यात भक्तांना द्विगुणीत लाभ मिळतो.
चक्री पारायण : भक्तांनी मिळून ठरवलेल्या प्रमाणे दररोज एक अध्याय जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला तर दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा या प्रकारे 21 अध्याय वाचून गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात. प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त या प्रकारे उपासना करतात.
संकीर्तन पारायण : एका भक्ताने व्यासपीठावर बसवून ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप.
सामूहिक पारायण : एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचे. यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात 21 अध्याय वाचन करतात. प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारयण करुन ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं.