गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

गणेश गीता अध्याय ५

Shree Ganesh Geeta Aadhyay 5
(गीति)
 
गणपति म्हणे वरेण्या, श्रौतःस्मार्तादि कर्मं करिं नित्य ।
 
फलइच्छारहित अशीं, मात्र करावीं सशास्त्रशीं विहित ॥१॥
 
न करी कर्म असा जो, योगाच्या आश्रयीं सदा योगी ।
 
१.
 
त्यापेक्षां कर्माचें, जो फल नेच्छीत श्रेष्ठसा योगी ॥२॥
 
योगप्राप्तीकरितां, कर्म असे योग हेंच साधन हें ।
 
सांगतसें भूपा हें, साध्य करायास हेतु हा आहे ॥३॥
 
इंद्रियनिग्रह करणें, शांती धरणें प्रमूख हे दोन ।
 
२.
 
हेतू साध्य करावे, ऐकें योगास योग्य गा जाण ॥४॥
 
विषयांचें चिंतन हें, करुनि करी कर्म सर्वदा जो तो ।
 
अपुला आपण वैरी, होतो तें तत्त्व सांगतों श्रविं तो ॥५॥
 
विषयांविषयीं राहे, निरिच्छ ऐसा करीतसे कर्म ।
 
३.
 
योगाची सिद्धी त्या, लाभे भूपा प्रमुखसें वर्म ॥६॥
 
मुक्‍ती आणिक बंधन, तैशीं द्वंद्वें अरी नि मित्र अशीं ।
 
४.
 
आत्म्याचें साहाय्य तयां, असतें नसतें अनात्मया ऐशीं ॥७॥
 
सुख दुःख साधु मानव, आणिक शत्रू तसेच मित्र अशीं ।
 
काष्टस्सुवर्ण आणिक, द्वेषी उद्विग्नमान युग्म अशीं ॥८॥
 
इत्यादी ठायासी, समबुद्धीनेंच पाहती जे ते ।
 
आणिक निजात्म तैसें, असति जितेंद्रिय सुयोग्य भूपा ते ॥९॥
 
मोठे ज्ञानी असुनी, असती विज्ञानयुक्‍त भूपा ते ।
 
योगाभ्यासासाठीं, योग्य निरंतर सुदक्ष असती ते ॥१०॥
 
योगाभ्यासासाठीं, निषिद्ध सांगें स्थळें नृपा ऐक ।
 
५-६
 
चित्त व्यग्र बुभुक्षित, व्याकुळ तापस श्रमीक नर ऐक ॥११॥
 
अतिशीत उष्ण काळीं, योगासी समय योग्य नाहींत ।
 
७.
 
योगासि योग्य नच जल, वायू वन्ही समीपसा प्रांत ॥१२॥
 
जेथें ध्वनि ऐकाया, येतो स्थल नी श्मशान गो-स्थान ।
 
भिंतीसमीप आणिक, शुष्क-तरु ध्वनिसयुक्तसें स्थान ॥१३॥
 
अग्नी वापी नदि नी, वारुळ संनिध करुं नये योग ।
 
८-९.
 
मोठा पडीत वाडा, पिशाच्च वसती करुं नये योग ॥१४॥
 
योगाभ्यासक याला, कळलें नाहीं वरील ते दोष ।
 
त्याला विकार होती, ऐक वरेण्या कथीतसें दोष ॥१५॥
 
वाटे शरीर जड हें, ज्वर आला कीं मनास विस्मरण ।
 
१०.
 
तैसेंच मांद्य आलें, वाचा बसली बधीर हो कर्ण ॥१६॥
 
यास्तव योगाभ्यासक, यांनीं जर दोष टाकिले नच हे ।
 
किंवा जरि यांविषयीं, आळस केला तरीहि सत्वर हे ॥१७॥
 
स्मृति-विभ्रमादि सारे, दोषहि जडती सनिश्चयें बा गा ।
 
११.
 
यास्तव सावध ऐकें, बोध असा हा अधींच हो जागा ॥१८॥
 
योगाभ्यासक यांनीं, बहु खाणें नी त्यजून उपवास ।
 
मित खाणें योग्य तया, निद्रेच्याही तशाच नियमांस ॥१९॥
 
इच्छा सोडुन सार्‍या, इंद्रिय-नियमन करुन वर्तावें ।
 
१२.
 
निद्रा-अहार दोनी, बेतानें ठेवुनी व वर्तावें ॥२०॥
 
यापरि हळुहळु शांती, मिळवावी योग्य साधनासाठीं ।
 
१३.
 
भूपा सावध ऐकें, सांगें ज्या मी पुढील त्या गोष्टी ॥२१॥
 
जिकडे तिकडे धावे, आवरुन मन तें त्वरीत वश करणें ।
 
१४.
 
आहे चंचल मोठें, यास्तव त्याला अधींच आवरणें ॥२२॥
 
येणेंपरि वर्तुन तो, योगी मिळवी सुयत्‍नशी सिद्धी ।
 
१५.
 
अपुल्यामाजी जग हें, पाहे तैसीच मूर्ति जगिं बुद्धी ॥२३॥
 
योगें करुन मजला, पाहे जो तो तयास मी पावें ।
 
१६.
 
तो मजला नी मीही, त्याला भूपा कधीं न विसरावें ॥२४॥
 
क्षुत् तृष्णादी द्वंद्वें, सुखदुःखहि तोष-द्वेष हीं राया ।
 
अपुल्यापरीच होती, समस्त भूतें तशीच मम काया ॥२५॥
 
ऐसा योगी मजला, सर्वव्यापक असे सदा पाहें ।
 
१७-१८.
 
मत्‌ठायीं भाव असा, जाणुन ब्रह्मादि वंद्य तो हो हें ॥२६॥
 
भूपति वरेण्य पुसतो, गणपतिसी प्रश्न आणखी जे ते ।
 
योग-द्वय साधाया, कठिण असें वाटतें प्रभू मातें ॥२७॥
 
मन हें चंचल आहे, निग्रह करणें बहूत यास्तव हें ।
 
१९.
 
पुसतो सुलीन वाचे, व्हावें कैसें मला कथा तें हें ॥२८॥
 
गणपति म्हणे वरेण्या, मन अवराया बहूत तें कठिण ।
 
ऐशा मनास अवरुनि, जो तो होतो स्व-मुक्त भव जाण ॥२९॥
 
अरघट्ट घडयाळाइव, चाले भवचक्र या जगामाजी ।
 
२०.
 
अवरुन मनास होतो, योगी हा पूज्य मानवां गाजी ॥३०॥
 
विषयी करवे ज्याला, कीलक त्याला स्व-कर्म जें त्यातें ।
 
२१.
 
ऐशा भवचक्रासी, तोडाया योग्य नरच कामुक ते ॥३१॥
 
चंचल मन जिंकाया, संतांचि संगति नि वैराग्य ।
 
गुरुचा प्रसाद आणिक, भोगाविषयीं निरिच्छ तो योग्य ॥३२॥
 
अतिशय दुःखद स्थितिही, मन जिंकाया अणीक कारण ती ।
 
२२.
 
होतें भूपति ऐकें, इतुक्या गोष्टी सुयोग्यशा होती ॥३३॥
 
किंवा अभ्यासानें, वश करणें योग-सिद्धिसी मन हें ।
 
२३.
 
मन आवरल्यावांचुन, दुर्लभ आहेच योगप्राप्ति हे ॥३४॥
 
वरेण्य भूपति वदतो, हे देवा योगभ्रष्ट जे होती ।
 
त्याला कवणा लोकीं, प्राप्ती होते तशीच गति प्राप्ती ॥३५॥
 
कैसी फलप्राप्ती तया, होते हे प्रश्न संशयी मतिनें ।
 
२४.
 
पुसतो सुलीन होउन, निरसा हे बुद्धियुक्तशा स्वमनें ॥३६॥
 
गणपति म्हणे वरेण्या, योगी होतो स्व-भ्रष्ट कर्मांसी ।
 
उत्तम देह धरुनियां, स्वर्गाचे भोग भोगुनीच इहवासी ॥३७॥
 
उत्तम कुलांत जन्मति, योगी ऐसे नृपा गती त्यांसी ।
 
२५-२६.
 
नंतर पूर्वी स्वीकृत, कर्मापरि योगि योग्य पुण्यासी ॥३८॥
 
नरकीं कधीं न जाती, ऐकें भूपा पुढील कथनासी ।
 
विधियुक्त कर्म करि जो, सु-तपी ज्ञानी बहूतसा यासी ॥३९॥
 
याहुन श्रेष्ठच योगी, अत्युत्तम भक्ति-युक्तसा भक्त ।
 
२७.
 
ऐसी योगप्रशंसा, कथिली पंचम तुला समासांत ॥४०॥
 
पंचम माला अर्पीं, प्रभु-कंठासी करुन कवनांची ।
 
सेवावी दासाची, प्रियकर वाटो प्रभूस ते साची ॥४१॥