1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 11 मे 2019 (14:45 IST)

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास राहुल गांधीच जबाबदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. राहुल उत्तर प्रदेशात सपा-बसपा युतीला, केरळात डाव्यांना, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचवत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
 
एका मुलाखतीत केजरीवाल यांनी ही टीका केली. दिल्लीत दोन दिवसांनी मतदान होणार असून त्याआधीच केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. जे चित्र दिसत आहे त्यावरुन काँग्रेस भाजपशी नाही जणू काही विरोधकांशीच लढत आहे, असे दिसत आहे. काँग्रेसमुळे जुळून आलेल्या अनेक गोष्टी बिघडत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
 
यावेळी केजरीवाल यांनी मोदींवर टीका करत प्रमुख क्षेत्रांमध्ये कोणतंही योगदान देण्यात ते असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. यामुळेच ते खोट्या देशभक्तीचे साहाय्य घेत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मोदींची देशभक्ती खोटी आहे. देशासाठी हे घातक आहे, असे यावेळी केजरीवाल यांनी सांगितले. आपले कोणतेही काम दाखवण्यासाठी नसल्यानेच मोदी मते मिळवण्यासाठी लष्कराचे साहाय्य घेत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. मोदी आणि अमित शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही हे दोघे सोडून कोणालाही समर्थन देऊ, असे केजरीवाल यांनी सांगितले.