रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:27 IST)

पाच कोटी लोकांनी बंद केली ई-शॉपिंग, कंपन्या चिंतेत

देशातल्या ई-कॉमर्स कंपन्या सध्या विचित्र संकटात सापडल्या आहेत. सुमारे पाच कोटी लोक ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून नियमितपणे ऑनलाइन शॉपिंग करतात, पण दुसरीकडे गेल्या वर्षभरात इतक्याच म्हणजे पाच कोटी लोकांनी ऑनलाइन शॉपिंग करणे बंद केले आहे. यामुळे कंपन्यांना 50 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
 
गुगलची कन्स्लटंट बेन अँड कंपनी आणि फिलँथ्रॉपिक व्हेंचर फंड ओमिड्यार नेटवर्कसने गेले 9 महिने दीर्घ अभ्यास करून हे ट्विट समोर आणले आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले की मागील वर्षी पहिल्या शॉपिंगनंतर 5.4 कोटी यूजर्सनी ऑनलाइन शॉपिंग बंद केली आहे. या गटात बहुतांश कमी उत्पन्न गटातले, इंग्रजीच्या तुलनेत प्रादेशिक भाषांशी अधिक जवळीक असणारे इंटरनेट यूजर्स आहेत. नियमित ऑनलाइन शॉपिंग करणारे आणि ई-शॉपिंगकडे पाठ फिरवणारे यांचे गुणोत्तर 1:1 आहे, हे ई-कॉमर्स क्षेत्रासाठी सर्वात मोठे आव्हान आहे.
 
गुगल इंडियाचे विक्री विभागाचे प्रादेशिक संचालक, विकास अग्निहोत्री म्हणाले, 'या 5 कोटी यूजर्सना पुन्हा ई-शॉपिंगकडे वळवले तर या क्षेत्रासाठी 50 अब्ज डॉलर्सच्या उद्योगाची संधी निर्माण होईल.' ओमिड्यार नेटवर्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रुपा कुदवा म्हणाले, 'या यूजर्सना पुन्हा ई-शॉपिंगकडे वळवायला खूप वेळ लागू शकतो. या यूजर्सची भाषेशी संबंधित समस्या आहे. या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्‌स इंग्रजीत असतात, त्यामुळे अशा यूजर्सना त्या आपल्याशा वाटत नाहीत.'