सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोलापूर , सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (07:23 IST)

कोथिंबिरीचा भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली

Coriander
एकीकडे भाज्यांपाठोपाठ धान्यांचे भाव गगनाला भिडले असताना शेतकऱ्यांनी आर्थिक गणित घालून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कोथिंबिरीचा भाव पार कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. दूर अंतरावरून वाहतूक खर्च करून आणलेल्या कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिली. फेकून दिलेली कोथिंबीर आसपासच्या मंडळींनी जनावरांना चारण्यासाठी आणि किरकोळ बाजारात विकण्यासाठी उचलून नेल्याचा प्रकार घडला. एक कॅरेट कोथिंबिरीला दहा रूपयेसुध्दा भाव मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातून आलेल्या तीन शेतकऱ्यांना सुमारे १६० कॅरेट कोथिंबीर रस्त्यावरच फेकून द्यावी लागली. लागवडीचा खर्च सोडाच, पण साधा वाहतुकीचाही खर्च निघत नसल्यामुळे संतप्त आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली.
 
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीर विकण्यासाठी बीड जिल्ह्यातून दीपक गहिनीनाथ ढाक व अन्य दोन शेतकऱ्यांनी दोनशे कॅरेट कोथिंबीर आणली होती. परंतु प्रतिकॅरेट अवघा दहा रूपये मिळाला. या कवडीमोल भावाने जवळपास ४०-५० कॅरेट कोथिंबीर कशीबशी विकण्यात आली. उर्वरीत १६० कॅरेट कोथिंबीर खरेदी करायला व्यापारी तयार नव्हते. तेव्हा शेतकरी अक्षरशः हतबल झाले. किमान लागवडीचा खर्च तर सोडाच, पण वाहतुकीचाही खर्च निघत नाही. उलट पदरचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहनातून कोथिंबीर उतरविलीही नाही.