एक प्रसंग
रुग्ण : डॉक्टर मला दोन दिवसांपासून ताप आहे आणि घसा दुखतोय. मी इंटरनेटवर वाचलं की हा पावसाळ्यात होणारा संसर्गजन्य आजार आहे.
डॉक्टर : मी सर्दी आणि तापासाठी काही औषधं देतो. जर दोन दिवसात ताप कमी झाला नाही तर ब्लड टेस्ट करू.
रुग्ण : मला माहिती होतं तुम्ही ही औषधं लिहून देणार.
डॉक्टर : अहो जर सगळंच माहीत होतं तर मग माझ्याकडे का आलात?
रुग्ण : कारण मेडिकल स्टोअरवाले डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं देत नाहीत म्हणून !
हे कोणतंही काल्पनिक संभाषण नाही. चेन्नईतले डॉक्टर अश्विन यांना आलेला अनुभव आहे.
डॉक्टर आजारांचे निदान करण्याचे दिवस आता गेलेत. सध्या रुग्ण स्वतःच सगळी माहिती 'गुगल डॉक्टरला' विचारतात.
डॉ. अश्विन म्हणतात, "अहो आमचं काम सोपं झालंय, पेशंट सगळंच नेटवर वाचून येतात. त्यांच्या आजाराची लक्षणं, त्यांना दिली जाणारी औषधं."
असा अनुभव फक्त डॉ. अश्विन यांना आलेला नाही. तर वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना असा अनुभव रोज येत असतो.
इंटरनेटवर माहिती वाचून स्वतःच्या आजाराचं स्वतःच निदान करणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढताना दिसतेय.
जगातली सगळी माहिती फक्त बोटांवर उपलब्ध असण्याच्या या जगात आपलं आयुष्य सोपं तर झालंय पण आरोग्यविषयक माहितीसाठी फक्त इंटरनेटवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.
तामिळनाडूतल्या मदुराईजवळच्या तिरुपांरांगुराममध्ये एका व्यक्तीने इंटरनेटवर आपल्या आजारासंबंधी माहिती वाचल्यानंतर आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या.
काही बातम्यांमध्ये असं म्हटलंय की हा माणूस आजारी असल्याने दवाखान्यात गेला. तिथे गेल्यावर त्याच्या शरीरात मिठाचं प्रमाण जास्त आहे.
शरीरात मिठाचं प्रमाण जास्त असल्यावर काय होतं याबद्दल या व्यक्तीने गुगल केलं आणि त्यातून त्याला भीती वाटली. यात असं म्हटलं होतं की अति मिठाने ऑर्गन फेल्युअर होतं. याचाच धसका घेऊन या माणसाने आत्महत्या केली.
गेल्या काही वर्षात युट्युबवर बाळंतपणाचे व्हीडिओ पाहून घरीच बाळांना जन्म देणाऱ्या महिलांची संख्या वाढतेय. अशा बाळंतपणात अतिरिक्तस्रावने महिलांचा मृत्यू झाल्याचेही अनेक प्रसंग आहेत.
फक्त तरुण नाही, सगळेच माहितीच्या मायाजालात
अलोपॅथी ते आजीच्या बटव्यातल्या औषधांपर्यंत सगळी माहिती इंटरनेटवर आढळते.
आजकाल आजार झाला की उपचारांसाठी डॉक्टरपेक्षा इंटरनेटवर अवलंबून राहण्याचा ट्रेंड वाढला आहे.
यात फक्त तरूण नाहीत तर 18 ते 45 या वयोगटातील लोक आहेत.
2021 साली झालेल्या एका अभ्यासात आढळून आलं की 71.8 टक्के अमेरिकन नागरिक त्यांच्या आरोग्यसंबंधी माहितीसाठी वेबसाईटवर अवलंबून आहेत. यातले 11.6 टक्के नागरिक सरळ गुगलसारख्या सर्च इंजिनवर जाऊन सर्च करतात. भारतातही अशी आकडेवारी समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको.
'दोन आठवडे गुगल करू नका'
चेन्नईतल्या एक मानसोपचार हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या पूर्णा चंद्रिका म्हणतात की आजकाल औषधं लिहून देताना हेही म्हटलं जातं की गुगलवर दोन आठवडे याबद्दल सर्च करू नका.
"मी मूड स्विंगसाठी एका रुग्णाला औषधं दिली. ही औषधं फिट येत असेल तरी दिली जातात. याबद्दल इंटरनेटवर वाचून त्या रुग्णाने मला विचारलं की मी फिट येणं थांबण्याची औषधं त्याला का दिली."
काही रुग्ण तर अशी माहिती नेटवर वाचून औषधं घेणं थांबवतात.
"त्यामुळे रुग्णाचा त्रास वाढतो आणि डॉक्टरांचं काम," त्या पुढे म्हणतात.
आता तर यात चॅट जिपिटीची भर पडलीये असं त्या म्हणतात.
डॉ अश्विन याबद्दल अधिक माहिती देताना सांगतात, "चॅट जिपिटीवर तुम्ही तुमची लक्षणं टाकली की तुम्हाला एक यादीच येते, की तुम्हाला कोणकोणते आजार असू शकतात. पण तुमच्या रोगाचं निदान फक्त डॉक्टर करू शकतात."
इंटरनेटवर वाचून डायट करावं का?
आणखी एक लोकप्रिय ट्रेंड म्हणजे इंटरनेटवर पाहून डायट करणं. नेटवर पॅलेओ डायट, किटो डायट,इंटरमिटन फास्टिंग अशा असंख्य डायटची माहिती मिळते.
पोषण तज्ज्ञ डॅफनी लव्हस्ले म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर असे डायट केले तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
त्या सांगतात, "तुमचा डायबेटीज कंट्रोल बाहेर जाऊ शकतो. तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीनची कमतरता जाणवू शकते."
त्या पुढे म्हणतात, "एका व्यक्तीला झालेला फायदा इंटरनेटवर व्हायरल होतो. त्यामुळे इतरांना वाटतं की त्यांनाही असाच फायदा होऊ शकतो."
गरोदर महिलांनी इंटरनेटवर माहिती सर्च करावी का?
गरोदरपणात इंटरनेटवर महिलांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सर्च करण्याची सवय असते.
त्यातल्या त्यात ज्या महिला पहिल्यांदाच गरोदर आहेत त्या इंटरनेटवर खूप वाचत राहतात.
स्त्रीरोग तज्ज्ञ जोसिफिन विल्सन म्हणतात की ही दुधारी तलवार आहे.
"महिलांना बाळंतपणाच्या प्रक्रियेबद्दल माहिती असणं, त्याबद्दल त्या जागरूक असणं चांगलं. पण या माहितीचा चुकीचा अर्थ काढला जातो तेव्हा ते घातक ठरू शकतं."
त्या पुढे म्हणतात, "समजा एका 2 महिन्यांच्या गरोदर महिलेला रक्तस्राव होत असेल तर गुगल सरळ म्हणेल की त्या महिलेचा गर्भपात झाला आहे. पण सत्य परिस्थिती तशी नसते."
डॉ. अश्विन आणखी एक उदाहरण देतात.
"तुम्ही समजा गुगलवर लो हिमोग्लोबिन असं सर्च केलं तर पहिला लेख कॅन्सरबद्दल येतो. जे किवर्ड्स लोकांनी सर्वाधिक सर्च केले आहेत, त्याबद्दल माहिती वर येते. ती माहिती योग्य असेलच असं नाही."
डॉ.अश्विन असंही म्हणतात की नेटवर खूप सारी चुकीची माहितीही आहे. त्यापासून सांभाळून राहिलं पाहिजे.
तुम्ही योग्य वेबसाइट कोणती ते डॉक्टरला विचारा असं ते सांगतात.
प्रत्येकाने 'फुलबॉडी चेकअप' करायला हवे का?
डॉ अश्विन म्हणतात, "आजकाल अनेक लोक स्वतःच टेस्ट करायला जातात. इंटरनेटवर माहिती वाचतात आणि टेस्टचे रिपोर्ट आले की त्यांना वाटतं आपल्याला हा आजार झालेला आहे. अनेक लोक स्वतःचं फुल बॉडी चेकअप करतात."
याची गरज नसते असं त्यांना वाटतं.
ते म्हणतात, "18 ते 45 या वयोगटातील आयटी कर्मचारी, तरुण आणि कॉलेजचे विद्यार्थी इंटरनेटवर अधिक विश्वास ठेवतात."
मेडिकल काऊन्सिलचं म्हणणं काय?
तामिळनाडू मेडिकल काऊन्सिलचे डॉ. सेंथील म्हणतात की आजकाल अनेक डॉक्टर्सही सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करताना दिसतात.
"यातल्या गोष्टी प्रत्येकालाच लागू होतील असं नाही. काही लोक अनावधानाने चुकीची माहितीही देऊ शकतात."
डॉ सेंथील पुढे म्हणतात, "आम्ही कोरोना काळात चुकीची माहिती पसरवली म्हणून एका डॉक्टरचं लायसन्स 6 महिन्यांसाठी सस्पेंड केलं होतं."
पण मेडिकल काऊन्सिल फक्त डॉक्टरांवर लक्ष ठेवू शकतं. बाकी इंटरनेटवर जो माहितीचा महापूर आहे त्याबद्दल प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा आहे असंही ते म्हणतात.
Published By- Priya Dixit